सहा सप्टेंबर.... आज आमच्या दोघांचाही वाढदिवस.. तिची जन्मवेळ सहा तारखेला रात्री १२.३० ची असल्यामुळे तसा तिचा वाढदिवस ७ तारखेचा..

सहा सप्टेंबर....
आज आमच्या दोघांचाही वाढदिवस.. 
तिची जन्मवेळ सहा तारखेला रात्री
१२.३० ची असल्यामुळे तसा तिचा
वाढदिवस ७ तारखेचा..पण आम्ही
सहा तारखेला एकत्रितच
साजरा करायचो..
आज तिचे पन्नासाव्या वर्षात पदार्पण
होणार होते.. वाढदिवसाची खुप स्वप्नं
रंगविली होती..पण नियतीला हे मान्य
नसावे.. कधी कधी जीवनप्रवासात
अगदी अनपेक्षितपणे असे एखादे वळण
येते की.......
सर्व स्वप्ने चक्काचूर होऊन जातात..
आम्ही दोघेही शिक्षक, मुलगा मेकँ.
इंजिनियर, मुलगी ग्रँज्युएशनच्या
शेवटच्या वर्षाला...असे आमचे छानं
चौकोनी कुटुंब...टु बीएचके गार्डन
फ्लँट, फोर व्हिलर अशी मर्यादित
मध्यमवर्गीय स्वप्नं पुर्ण करत असताना मी
माझ्या दोन्ही भावांबाबतची कर्तव्य विसरलो नव्हतो..
आणि त्यांना उभं करण्यात तिनेही
मला अगदी मनापासुन साथ दिली होती...
पण हे सर्व करत असताना..कर्ज काढणे
आणि फेडणे यात मी कधी पन्नाशी गाठली
समजलेच नाही..  एखाद्या गोष्टीचा
ध्यास घेतल्यानंतर ती गोष्ट पुर्ण होई
पर्यंत कुठल्याच गोष्टींच भान रहात
नाही.. तसंच काहीसं माझ्या बाबतीत
झालं.. या दरम्यान कित्येकदा अनेक
छोट्यामोठ्या गोष्टींचा राग मी 
तिच्यावर काढायचो..
२४ वर्षापुर्वी ती माझ्या जीवनात
आली.. तेव्हापासुन आजपर्यंत तिने
सर्व कौटुंबिक जबाबदार्या समर्थपणे
पेलल्या.... आणि मी मात्र तो माझा
हक्क समजत आलो.. आज मला
जाणवतयं की गेल्या २४ वर्षात मी
तिच्या मनाचा कधी विचारच केला
नाही..  थोडसं मागे वळून आत्ता
पर्यंतचा जीवनप्रवास जेव्हा मी पाहतो..
तेव्हा आज वेळ निघून गेल्यावर तिच्या
योगदानाची मला किंमत कळतेय..
वडिल क्रिडा शिक्षक असल्याने घरात
अतिशय कडक, शिस्तप्रिय  वातावरण..
आई धार्मिकता जपणारी, जुन्या वळणाची..
त्यामुळे सुरवातीचे पाच सहा महिने
तिला खुप जुळवून घ्यावे लागले.. पण
थोड्याच दिवसात तिच्या प्रेमळ
मनमिळाऊ लाघवी स्वभावाने तिने
सर्वांची मनं जिंकली.. माझे आईवडील,
दोन भाऊ आणि एक वर्षाचा छोटा
ओंकार यांच्याशिवाय तिचे दोन भाऊही
काही दिवस माझ्याकडे शिकायला होते
तेव्हा या सर्वांचे डबे करुन ..आणि न
चुकता देवपुजा करुन .. सकाळी
सातची शाळा गाठताना तिची होणारी
कसरत मला कधी दिसलीच नाही.. गेल्या २४ वर्षाच्या सहवासात कित्येक ठिकाणी तिने केलेला त्याग, कुठलाही हट्ट न करता तिचं ते मनं मारुन जगणं  मला कधी दिसलेच नाही.. याची सदैव खंत वाटत राहते..
आँक्टोबर २०१५ च्या दरम्यान तिला काहीही खाताना गिळायला थोडा त्रास व्हायला लागला..
थायराँईडची गोळी चालू असल्यामुळे
त्रास होत असेल असे सुरवातीला वाटले.
ईएनटी डाँक्टरांनां दाखविले असता.. 
सायकाँलाँजिकली त्यांना तसं वाटतयं..
असं सांगितल्यावर थोडा निर्धास्त झालो..
पण त्रास वाढत गेल्यावर एन्डोस्कोपी
केली..आणि १५ जानेवारी २०१६ रोजी
तिच्या अन्ननलिकेत कँन्सरची गाठ
असल्याचे निदान झाले, माझ्यासाठी
हे खुप शाँकिंग होते... कारण ....
एकतर ती खुप धार्मिक होती.. तिच्या सर्व
आरत्या, स्तोत्र पाठ होती.. रोजची
पुजाअर्चा, सकाळ संध्याकाळचे
अग्निहोत्र, गेल्या कित्येक वर्षापासुनचा
श्रावणातील एकावळ्याचा उपवास,
दर श्रावणातील पोथीवाचन, यामुळे
परमेश्वर तिच्याबाबत एवढा निष्ठूर
पणाने वागणार नाही याबद्द्दल पुर्ण
खात्री होती..याशिवाय..आरोग्याच्या
बाबतीतही ती खुपचं जागरुक होती..
हँपी थाँट्स, आर्ट्स आँफ
लिव्हींगचा असे अनेक छोटेमोठे कोर्स करत, नाशिक
योग विद्याधामचा योग शिक्षिकेचा
कोर्सही तिने केला होता..त्यामुळे गेल्या
चार पाच वर्षापासुन तिचा दिवस
सकाळी ५.०० वाजताच सुरु व्हायचा,
सकाळचे योगा, प्राणायाम, आणि अर्धा
तास वाँकिंग ती नियमितपणे करत
होती.. आणि असे असताना तिला
असा काही आजार होऊ शकतो
यावर विश्वासच बसत नव्हता.. १७
तारखेला ती गाठ कँन्सरचीच आहे हे
समजल्यावर मात्र पुरता कोलमडून
पडलो.. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता..
२० तारखेला रुबी हाँस्पिटलला अँडमिट
केले आणि २२ जानेवारीला ४० टाक्याचे
मोठे आँपरेशन करुन ती गाठ काढली..
त्यानंतर सात आठ महिन्यात तब्येत
थोडी व्यवस्थित झाली.. थोडा धीर
आला पण तो क्षणिकच होता.. 
नोव्हेंबरमध्ये पुन्हा तिला त्रास सुरु
झाला.. केमो सुरु करावे लागले ..
आणि तब्येतीची घसरण सुरु झाली..
जानेवारीपर्यंत तीन महिन्यात २५
किलोने वजन कमी झाले..मी रात्रंदिवस
रोज ईश्वराचं नामस्मरण करत होतो..
तिची धार्मिकता बघता, आणि आरोग्य
विषयक जागरुकता बघता ती १००%
यातुन बाहेर पडेल याची मनोमन खात्री
वाटायची.. १०० /१०० चे सात केमो
दिल्यावर ..जानेवारी २०१७ मध्ये..
डाँक्टरांनी जेव्हा ती गाठ अन्ननलिका
आणि श्वासनलिकेच्या मध्ये असून
एक दोन नोड्स फुफ्फुसात गेलेत
ज्यावर काहीच करता येण्यासारखे
नाही.. अशी स्पष्ट कल्पना दिली... तेव्हा मात्र धीर खचला.. ...सर्व रिपोर्ट्स घेऊन टाटा
हाँस्पिटलला गेलो.. आणि तिथेही
त्यांनी तेच सांगितले.. पण मनं
मानायला तयार नव्हतं.. तिला
वाचविण्यासाठी जे जे जिथं जायला
सांगतील तिकडे गेलो.. कर्नाटकमध्ये
शिमोगा, बलसाड गुजरात, दिंडोरी
नाशिक, सर्वत्र जाऊनही फरक नव्हता ..
तब्येत जास्तच खालावत चालली होती..
आणि त्याही स्थितीत ती मला धीर देत
होती कि.. सतिश तु काळजी करु नकोस
मला काहीही होणार नाही...काय करावं,
कुठे जावं, तिची अवस्था बघून मनं
सैरभैर झालं होतं.. मंदिरात गेलो, खुप
रडलो.. ईश्वराजवळ आळवणी केली
की हे ईश्वरा, माझं आयुष्य माझ्या
स्मिताला दे, काहीतरी चमत्कार कर
आणि तिला यातुन वाचवं..मी तुझा
जन्मोजन्मी रुणी राहील.. पण
माझी हाक त्या परमेश्वरापर्यंत पोहचली
नसावी..किंवा कदाचित माझ्या हाकेत
ती आर्तता नसावी.... शेवटी मनं घट्ट
केलं.. बर्याच डाँक्टरांशी चर्चा केली..
स्पष्टपणे कोणी सांगत नसले तरी चर्चेतून
तिचं आयुष्य खुप कमी उरलयं याची
जाणीव झाली.. तिच्या शेवटच्या
काळात तिला कमीत कमी त्रास व्हावा..
आणि तिला जास्तीत जास्त प्रेम देता
यावं यासाठी पाचगणीला ( सासुरवाडीत)
वन बीएचके फ्लँट रेन्टवर घेतला आणि
पुर्ण दोन महिने तिच्यासोबत घालवले..
जे माझ्यासाठी एक अविस्मरणीय
आठवणं राहील..या दोन महिन्यात
मला तिचं जे रुप पहायला मिळालं
ते विलक्षण वेगळं होतं.. त्या दरम्यान
प्रथमच तिचे कित्येक असे पैलू मला
पहायला मिळाले कि ज्याकडे
एवढ्या २४ वर्षात मी कधीच लक्षचं
दिले नव्हते..  लहानपणापासुनच्या
सर्व गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर
केल्या.. खुप हसलो.. खुप रडलो..
आयुर्वेदिक औषधामुळे..शेवटचे दोन
दिवस सोडले तर शेवटपर्यंत ती अगदी
नाँर्मल व्यवस्थितपणे बोलत होती...
तिला शेवटपर्यंत हा विश्वास वाटत
होता ..कि काहीही करुन मी तिला या
आजारातुन बाहेर काढेल..पण नाही
शक्य झालं मला ते.. तिला कितीही
त्रास होत असला तरी मला त्रास होऊ
नये म्हणून ती कधीही तो चेहर्यावर
दिसू द्यायची नाही... शेवटी शेवटी
जेव्हा तिला सर्व जाणवलं तेव्हा ..
"मला जगायचयं रे सतिश..." हे
सांगणारी तिची ती करुणाभरी नजर ...
आणि  माझी असहाय्य अगतिकता..
आजही मला अस्वस्थ करत राहते....
२२ जुलैला ती गेली.. त्याला आज
दिड महिना झाला.. पण अजूनही त्या
धक्क्यातून मी पुर्णपणे स्वतःला सावरु
शकलो नाही.. ती गेल्यावर...आज
मला जाणवतयं की माझं तिच्यावर
किती प्रेम होतं.. आपली अर्धांगिनी...
आपल्या जीवनाचा जोडीदार अकाली
जाणं यासारखं दुःख नाही.. एखादा
आघात ऐकणं.. आणि तो प्रत्यक्षात
अनुभवणं..यातील खुप फरक असतो
जो मी आज अनुभवतोय..
आज आम्हा दोघांच्या वाढदिवसा
निमित्ताने माझ्या सर्व मित्रांना
एकच विनंती करावीशी वाटते..की ..
जाताना सर्व इथचं ठेवुन जायचयं
हे माहिती असूनही आपण आयुष्यभर
फक्त धावत राहतो.. ती धावाधाव
थोडी कमी करुन आपल्या जोडीदारा
साठी, कुटुंबासाठी वेळ द्या..
एकमेकांच्या भावना जपत..
एकमेकांना भरपुर प्रेम द्या.. जाँब
करुन संसाराची जबाबदारी पेलताना
आपल्या अर्धांगिनीची होणारी
दमछाकं समजून घेऊन तिचा
ताण कमी करण्याचा शक्य तितका
प्रयत्न करा....आणि आरोग्य हिच
दिर्घकाल टिकणारी खरी संपत्ती
आहे याच भान उभयंतांनी ठेवा..
माझ्या मित्रांमधील हा बदल ...
हिच माझ्या स्मितासाठी
खरी श्रध्दांजली असेल...

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी