सायरस पूनावाला दि ग्रेट

सायरस पूनावाला  दि ग्रेट : 
              सप्टेंबर २०१५ मध्ये एके दिवशी  पेपरमध्ये बातमी झळकली कि , मुंबई मधील उच्चभ्रू अशा मलबार हिलच्या ब्रीच कॅन्डी परिसरातील अरबी समुद्राकिनारी  स्थित असलेली लिंकन हाऊस ही ऐतिहासीक वास्तू डाॅ सायरस पूनावाला ह्या पुण्याच्या उद्योगपतींनी तब्बल ₹७५० कोटी इतक्या घसघशीत रक्कमेला लिलावात विकत घेतली. ह्या व्यवहाराच्या एक आठवडाभर आधी मुंबईतील सर्वात महागडी खरेदी कुमारमंगलम बिर्ला यांनी सुमारे ₹४५० कोटींना जाटीया हाऊसच्या रूपाने केली होती.  
              लिंकन हाऊस म्हणजे एकेकाळचा राजस्थान मधील वांकानेर संस्थानच्या प्रतापसिंह महाराजांचा महाल होता . नंतर १९५७ च्या सुमारास अमेरीकन दूतावासाने तो विकत घेऊन तिथं कन्सुलेट जनरल थाटलं होतं. इतकी प्रतिष्ठित वास्तू एका पुणेकरानं मुंबईकर धनिकांच्या नाकावर टिच्चून घेतली याचा माझ्यातील पुणेकराला खूप अभिमान वाटला होता .
              ज्या दिवशी हि बातमी वृत्तपत्रांतून झळकली त्या दिवशी मी शरद पवार  साहेबांसमवेत पेडर रोडवरून त्यांच्या मुंबईतील  सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाकडे निघालो होतो. पवारसाहेब म्हणाले “ सायरस आणि मी पुण्यातल्या बीएमसीसी चे वर्गमित्र ; सायरसच्या वडिलांनी सायरसला काॅमर्सला मुद्दाम टाकले ; उद्देश हा की कॅम्पमध्ये फर्निचरचं दुकान सांभाळावं ; स्टड फार्मची जबाबदारी सांभाळावी. पण झालं उलटंच सायरसचं लक्ष स्टड फार्म मधील घोड्यांवर असावं. आणि साप घोड्याला चावला तर घोड्याच्या रक्तात प्रतिजैविके तयार होतात हे सायरसच्या मनात बसलं असावं. त्याने स्टडफार्मवरच एका छोट्याश्या खोलीत कमी भांडवलावर प्रतिजैविके व रोगावरील लसी संशोधनाची प्रयोगशाळा उघडली. “ साहेब पुढे हे ही म्हणाले कि, “ सायरस डिपीटी आणि इतरही लसी भारतात अत्यंत कमी किंमतीत विकतात. जो काही नफा मिळतो तो परदेशात निर्यात करूनच ! “ 
               आपला उद्योग व्यवसाय करत देशाशी बांधिलकी ठेवणारा; मुलं म्हणजे देशांचं भविष्य ! त्यांच्या जिविताची काळजी घेणारा ; कोणतीही जाहिरातबाजी , सेवेचं प्रदर्शन न करता मानवजातीचे आरोग्य हित जपणारा आणि त्यातूनही व्यवसाय वृद्धींगत करणारा हा आगळा -वेगळा आणि विरळा कर्मोद्योगी मला खूपच भावला. 
              डाॅ सायरस पूनावालांना प्रथमच: मी बीएमसीसी काॅलेजच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभा दिनी मी लाल गडद रंगांच्या लिमोझिन मधून आलेलं पाहिलं होतं. सायरसजी आणि पवार  साहेबांचे वर्गमित्र विठ्ठलशेट मणियार हे ही माजी विद्यार्थी असल्याने त्या कार्यक्रमाला हजर होते. मणियार शेट यांनी सांगितले कि, आम्ही मित्र    बॅकबेंचर्स     होतो.  त्यांनी मला बीएमसीसी मधील साहेब व मित्र बसायचे ती वर्गखोली आणि  पहिल्या  रांगेतले  शेवटून  तिसरे-चौथे  बाकडे पण दाखवले. माझ्या डोळ्यांसमोर साहेबांसमवेत बसलेली ही मित्रमंडळी दिसली.-कालचे बॅकबेंचर्स-आजच्या- आणि उद्याच्या- पिढीचे भाग्यविधाते झालेले होते*. माझ्यासाठी हा एक स्फुरण चढवणारा क्षण होता. मी तो बेंच डोळ्यात साठवला. आज ही आठवण आली कि ,तो तसाच डोळ्यांसमोर उभा राहतो. सायरस सरांची बॅकबेंच पासून सुरू झालेली घोडदौड स्वत:च्या गल्फस्ट्रीम विमानातून वेगाने सफर करीत आहे . हा सारा प्रवास तुम्हा -आम्हाला थक्क करून सोडणारा, प्रेरणादायी आणि स्वप्नवत असा आहे. 
          २०१५ साली साहेबांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात १० डिसेंबर ( वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ) ‘ न भुतो न भविष्यती ‘ असा सत्कार सोहळा झाला.एकाच व्यासपीठावर देशाचे महामहिम राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी ,पंतप्रधान मा. श्री . नरेंद्र मोदी , सोनियाजी , माजी पंतप्रधान मनमोहन सिंहजी  यांची साहेबांच्या गौरवार्थ ऐतिहासिक भाषणे झाली. त्यानंतर काही दिवसांनी पुण्याच्या रेसकोर्सवर झालेल्या सत्कार  कार्यक्रमात डाॅ सायरस पूनावालांचे  भाषण झाले. त्यांनी फार थोडके भाषण केले पण त्यांचे एक वाक्य रेसकोर्स वरील लाखोंच्या जनसमुदायाला अवाक करून गेले. “ राजीव गांधीच्या मृत्यूनंतर शरदला ज्या खासदारांनी आणि नेत्यांनी पंतप्रधान होऊ दिले नाही त्यांना मी कधीही माफ करणार नाही” असे ते वाक्य होते. *हा सज्जड दम नव्हता पण अंतर्मनापासून केलेला निषेध होता*. अशी स्पष्टोक्ती जनसमुदायाला आणि साहेबांना देखील अभिप्रेत नव्हती. त्या कडवट प्रहारातून त्यांचं साहेबांवरचं अपार प्रेम जाणवलं. ते वाक्य कानाला कडक पण मनाला अतिशय गोड वाटलं. 
         पूनावालांची हिच स्पष्टोक्ती , हाच रोखठोक पणा मला काल परवा दिसून आला. २६ एप्रिल  रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास हडपसर येथील सिरम इन्स्टीट्यूटला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयावरील संसदीय स्थायी समितीने भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री श्री आनंद शर्मा यांच्या अध्यक्षते खालील समितीच्या दहा खासदारांच्या चमूचे साहेब देखील एक सदस्य म्हणून उपस्थित  होते.   
        सिरम सारखी खाजगी कंपनी उद्योग क्षेत्रात झेप घेते पण सरकारच्या अंगीकृत कंपन्या बंद पडताहेत हा मुद्दा चर्चीला गेला तेव्हा ते सरकारच्या लालफितीच्या कारभारावर तुटून पडले. “मी इतका संघर्ष केला आहे कि बस्स ! माझा मुलगा अदर मला ‘ तुम्ही दिल्लीला जाऊ नका ‘ अशी आग्रहानं विनंती करतो. तुमचे अधिकाऱ्यांशी  थेट भांडण होईल आणि काम अडेल  अशी त्याला भिती असते.”
पूनावालांचा स्वभावच सडेतोड आहे. एखादा चुकीचं वागला कि त्याचा जाग्यावरच हिशोब चुकता करतात. टाॅलरन्ट लसी बनविणाऱ्या पूनावालांच्या देही दांभिकता , बेशिस्तपणा यांच्याबाबतीत मात्र झिरो टाॅलरन्स आहे. एकदा कोणत्या तरी आजारावरील लसी सरकारने वितरीत करताना योग्य तापमान राखण्याची काळजी नाही ; परिणामी काही मुलं आजारी पडली याचं त्यांना दु:ख झालं . त्यांनी थेट मंत्र्यांना जाब विचारला . मंत्री महोदयांनी ‘ अहो , अंमलबजावणीत असे  चार दोन प्रकार होतात ‘ असे गुळमुळीत उत्तर दिले. याची चीड या भेटीवेळी त्यांनी व्यक्त केली. ‘जागतिक दर्जाेचा सिरम प्रकल्प पाहण्यासाठी पवार साहेब मोदीजींना घेऊन येतात पण आपले  काही मंत्री शेजारी उद्घाटने करून जातील पण इकडे निमंत्रण देऊन सुध्दा फिरकत नाहीत ‘ अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. संसदीय मंडळाला  त्यांच्यातील ‘झिरो टाॅलरन्स टू एनी नाॅनसेन्स ‘ ह्या दृष्टिकोनाचा एक अनोखा अनुभव आला. 
         शरद पवार साहेबांनी *अदर पूनावाला हे स्वच्छता मिशनवर काम करतात* हे सांगितलं तेव्हा सायरसजी ताड्कन म्हणाले कि “माझा मुलगा अदर स्वच्छता अभियानावर *वर्षाकाठी  १०० कोटी खर्च करतो आहे*. *पंतप्रधानांनी स्वच्छता दूत म्हणून त्याचं कौतुक केलं आहे*. पण माझा स्वच्छतेवर १०० कोटी खर्च करण्याला तत्वत: विरोध आहे. अर्थात यापासून *मी मुलाला रोखत नाही* पण मी असा निधी  कचरा साफ करण्यासाठी न करता,  घाण करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी वापरला असता. अहो , रस्त्याच्या कडेला डस्टबीन ठेवलेले असतात, काही जण अगदी जवळ जातात पण कचरा डस्टबीनच्या आजूबाजूला टाकतात. जरा कंबर वाकवून , हात पुढे करून त्या कुंडीत कचरा पडेल याची काळजी घेत नाहीत. अशा बहाद्दरांना शिक्षा नको तर काय करायला हवे ! “ असा पवित्र पाहून संसदीय मंडळ देखील स्तंभित झाले असावे पण सर्वांनी  हसून दाद दिली.
           भेटीवेळी मला  काॅन्फरन्स हाॅलबाहेर सायरसजींच्या पत्नी विलू पूनावाला यांची प्रतिमा भिंतीवर दिसली. कुणीतरी सांगितलं कि , त्यांच्या लहान-मोठ्या वस्तू सायरसजींनी आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. मुलगा अदर यांची बालपणापासूनची खेळणी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहेत. अंतर्मनात प्रचंड प्रेम,अनुकंपा , भावूकता असणारा माणूसच असे करतो. 
             ‘लस टोचणं‘ हे जगवण्यासाठी हितकारक असतं . फाटलेलं शिवण्यासाठी , तुटलेलं सांधण्यासाठी तसेच व्यवस्थेवरची झापड उडविण्यासाठी टोचावंच लागतं. सायरसजींचं सडेतोड बोलणं कोणत्याही व्यवस्थेतील लोकांना कदाचित बोचलं असेल तर त्यांनी कृपया हे जाणून घ्यावं. सायरसजींच्या आडनावात पूनावाला असल्यानं कुणाच्याही तात्काळ लक्षात येतं कि ते पुण्याचे आहेत . पुण्याच्या लौकिकात त्याने अधिक भर पडते. सायरस पूनावालांचे कार्य जगाच्या १७० देशांतील सुमारे ६५% मुलांना जगवणारं  व त्यांच्या पालकांमध्ये कृतार्थ भाव जागवणारं आहे. अशी माणसं केवळ पुण्या अथवा देशासाठी भूषणावह नसतात तर अखिल मानवजातीसाठी एक देणगी असतात.                                              
              इ.स.पुर्व ६ व्या शतकात आखातात सायरसने प्रशियाचं साम्राज्य स्थापन केलं आणि त्याच शतकात करूणेचा सागर तथागत गौतम बुध्द भारतात जन्मला. सायरसचा अर्थच सिंहासनाधिश ! या युगातल्या सायरसने      सिरमरुपी वारूवर आरूढ होऊन अखंड विश्वात संचार केला पण तो मानवजातीच्या कल्याणासाठी ! लसीच्या रूपाने करूणेचा कुंभ हाती घेऊन ! डाॅ. सायरस पूनावालांची ही उर्जा अक्षय्य राहो हीच सदिच्छा !

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी