झुंज....रामशेजचा किल्लेदार हा अगदी....
जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाज्याच्या वरच्या
बाजूला असलेली छोटीशी झडप उघडली गेली. त्यातून एका व्यक्तीने डोकावून
बाहेर पाहिले. त्याच्या नजरेच्या समोरच रावजी उभा असल्याने त्याने तिथूनच
विचारले.
“कोन हाये?”
“म्या रावजी, किल्लेदारास्नी भेटायचंय.” रावजीने उत्तर दिले.
“काय काम हाये?” पुढचा प्रश्न विचारला गेला.
“त्ये किल्लेदारास्नीच सांगायचा हुकुम हाये.” रावजी उत्तरला आणि झडप बंद झाली. काही क्षणात परत ती उघडली गेली आणि पुढचा प्रश्न आला.
“कुन्कून आलायसा?”
“गडावरनं आलोय... राजांचा सांगावा घिवून.” रावजीने उत्तर दिले
आणि परत झडप बंद झाली. काही वेळ गेला आणि साखळ्यांचे आवाज ऐकू आले. त्याच
बरोबर मोठा लाकडी ओंडका सरकावल्याचा आवाज झाला. हळूहळू काहीसा आवाज करत दार
उघडले गेले. तो पर्यंत रावजीने परत घोड्यावर बैठक मारली आणि तो दरवाजा
पूर्ण उघडण्याची वाट पाहू लागला.
दरवाजा पूर्ण उघडला जाताच आतून चार पहारेकरी बाहेर येवून उभे
राहिले. त्यांच्या मागून अजून एक जण बाहेर आला. कपड्यांवरून तो
पहारेकऱ्यांचा अधिकारी वाटत होता.
“निशानी?” आल्या आल्या अधिकाऱ्याने काहीशा चढ्या आवाजात
रावजीला विचारले. रावजीने आपल्या शेल्याला खोचलेली राजमोहोर बाहेर काढून
अधिकाऱ्याच्या हातावर ठेवली. तिच्याकडे एकदा उलटसुलट निरखून पाहून त्याने
ती निशाणी परत रावजीच्या हातात दिली आणि हातानेच दरवाजातून आत जाण्याची
परवानगी दिली.
किल्लेदार त्याच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करत
मुख्य वाड्याच्या बैठकीत बसला होता. तेवढ्यात एक शिपाई त्यांच्या समोर आला
आणि त्याने सगळ्यांना लवून मुजरा केला. किल्लेदाराचे लक्ष त्याच्याकडे
जाताच त्याने इतर अधिकाऱ्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला.
“बोल रे..”
“माफी असावी सरकार, पन गडावरनं राजांचा सांगावा आलाय...” शिपाई किल्लेदाराच्या पायाकडे पाहत म्हणाला.
“आऽऽऽ राजांचा हुकुम? आरं मंग हुबा का? जा त्याला आत घीवून ये...”
घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला.
घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला.
काही वेळातच रावजी किल्लेदारासमोर हजर झाला. आल्या आल्या त्याने किल्लेदाराला लवून मुजरा केला आणि मान खाली घालून उभा राहिला.
“काय हुकुम आहे राजांचा?” किल्लेदाराने रावजीकडे पहात प्रश्न केला.
“राजानं खलिता धाडलाय...” कमरेचा खलिता आदबीने काढून किल्लादारच्या हाती देत रावजी उत्तरला.
“अस्सं... गडावर समदं ठीक हाय नव्हं?” रावजीच्या हातून खलिता घेत किल्लेदाराने विचारले.
“व्हय जी...”
किल्लेदाराने खलिता वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू
त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी
प्रत्येक तेरा वाचू शकत होता.
रामशेज किल्ला हा तसा जिंकायला अगदी सोपा वाटणारा. कुठल्याही
दऱ्या किंवा सुळके आजूबाजूला नाहीत. फक्त एकच डोंगर. ज्यावर हा किल्ला
बांधला गेला. त्याच्या चहुबाजूने पूर्ण पठार. वेढा द्यायचा म्हटला तर ५०००
सैन्य देखील पुरेसे पडू शकेल असा किल्ला. सह्याद्रीच्या इतर
किल्ल्यांप्रमाणे याला ना भव्यता, ना सौंदर्य. ना नैसर्गिक सुरक्षितता.
काहीसा एकाकी. आणि अशा या एकाकी किल्ल्याकडे बादशहाची वाकडी नजर वळली होती.
किल्ला लहान असल्याने त्यावर पुरेसा दारुगोळाही नव्हता. फौजफाटा आणि
हत्यारे देखील अगदीच जेमतेम. आणि हेच मुख्य कारण होते किल्लेदाराच्या
काळजीचे. संभाजी राजांनी जितके शक्य होईल तितकी कुमक पाठवली होती पण तरीही
ती साठवायला जागाही पाहिजे ना? गडावर इनमिन ६०० लढवैये. काही स्त्रिया,
वृद्ध आणि मुले.
“कोन रे तिकडे?” किल्लेदाराने आवाज दिला आणि एक शिपाई आत आला.
“याच्या राहन्याची, शिदोरीची यवस्था करा...” किल्लेदाराने हुकुम सोडला आणि रावजी मुजरा करून माघारी वळला.
किल्लेदाराने राजांचा निरोप सगळ्यांना सांगितला आणि यावर काय उपाय करावा याचे खलबत सुरु झाले.

*क्रमशः
*क्रमशः
“शहाबुद्दीन खान...!” बादशाहने आपला मोर्चा शहाबुद्दीन खानाकडे वळवला.
“जी जहांपना...!” काहीसे उठत मान खाली घालून खानाने बादशहाला कुर्निसात केला.
“हमारा सबसे बडा दुश्मन कौन था?” आपली दाढी एका हाताने कुरवाळत बादशाहने प्रश्न केला.
“वो.., दख्खन का चुहा जहांपना...!” खाली मानेनेच खानाने उत्तर दिले. खानाचे उत्तर ऐकताच बादशहाच्या चेहऱ्यावर कुटील स्मित आले.
“अब तो वो नही है ना?” बादशहाचा पुढचा प्रश्न.
“नही जहांपना...!” खान फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
देत होता. दरबारात पूर्ण शांतता होती. प्रत्येक जण बादशहा काय म्हणतोय हे
कान देऊन ऐकत होता.
“तो फिर दख्खनके किले अभी हमारी सल्तनतमे क्यो नही है?” एकाएकी बादशहाचा आवाज चढला.
“हुकुम किजीये जहांपना. कुछ ही दिनोमे सारे किले अपनी
सल्तनतमे शामिल होंगे.” खानाने आपली नजर वर उचलत आणि एक हात आपल्या
तलवारीच्या मुठीवर ठेवत उत्तर दिले.
“ठीक है... जितनी भी फौज चाहो, तुम्हे मिल जायेगी..” बादशहा खुश झाला.
“गुस्ताखी माफ जहांपना...!” एक सरदार उठून कुर्निसात करत म्हणाला.
“बोलो... क्या बात है?” बादशहा काहीसा चिडला.
“जहांपना.. सिवा का बेटा संभा अपने बापसे दस कदम आगे है...
आजतक हमारी फौजे उसको एक बार भी शिकस्त देनेमे कामयाब नही हुई है...” त्या
सरदाराने खाली मानेनेच मनातील विचार बोलून दाखवला. मराठ्यांच्या छापेमारीने
आणि पराक्रमाने हैरान झालेला बादशहा अजूनच भडकला. एक तुच्छ सरदार
आपल्यापुढे आपलेच अपयश दाखवतोय हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण
राज्य टिकवायचे तर प्रत्येक गोष्टींचा विचार करणे हेही तितकेच महत्वाचे
होते. त्यामुळे त्याने आलेल्या रागावर काहीसे नियंत्रण मिळवले पण चेहऱ्यावर
आलेला संताप कुणापासूनही लपू शकला नाही.
“तो?” बादशहा काहीसा ओरडलाच.
“माफी जहांपना... पर संबाको शिकस्त देनी है तो पेहेले उसके
मुलुखपर कब्जा करना पडेगा. अभी संबा रायगडपे है, हम गुलशनाबाद लेते है तो
संबा अपने बीलसे निकलेगा, और हम आसानीसे उसे खात्म कर सकते है...!”
सरदाराने आपला कुटील विचार बोलून दाखवला. हे ऐकून मात्र बादशहाचा संताप
बराच कमी झाला. सरदाराने जे काही बोलला त्यात काहीच गैर नव्हते. जोपर्यंत
संभाजी सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे तोपर्यंत त्याला शिकस्त देणे आपल्याला
शक्य नाही हे बादशाह पक्के जाणून होता.
“ठीक है...!” बादशहा म्हणाला आणि सरदार खाली बसला. खान मात्र अजूनही उभाच होता. बादशहाने पुन्हा आपला मोर्चा खानाकडे वळवला.
“शहाबुद्दीनखान... तुम १० हजार की फौज लेकर गुलशनाबाद जावो.
सबसे पहले वहां का सबसे छोटा किला रामसेज कब्जेमे लो. फिर त्र्यंबक,
अहिवंत, मार्कंडा और साल्हेरपे आपना चांदसितारा लेहेरावो... अगर जरुरत पडे
तो धोडपसे अलीवर्दीखान तुम्हे सहायता देगा.” बादशहाने हुकुम दिला.
“जी जहांपना...”
“रामसेज याद है ना? पेहेले भी तुमने कोशिश की थी, और खाली हाथ
आए थे..!” बादशाहने खानाला मुद्दाम आठवण करून दिली. कारण जितका खान
संतापेल तितका अधिक आक्रमक होऊन किल्ला लवकरात लवकर घेईल हेच बादशहा मानत
होता.
“जी जहांपना..! पर तब बात अलग थी. अब बात अलग है. किलेपर कोई
भी सरदार नही है. कोई नया किलेदार तैनात है. बहुत छोटासा किला होने के कारन
वहां लोग भी ज्यादा नही है. और जो है उसमेभी बहोतसे बुढे और बच्चे है...!”
संपूर्ण दरबारात बादशहाने आपल्याला खिजवले हे खानाला पसंत पडले नाही.
त्याचा चेहराच ते सांगून जात होता.
“तो? कितने दिन चाहिये?” आपली मात्रा बरोबर लागू पडली हे पाहून खुश होत बादशहाने विचारले.
“सिर्फ एक दिन जहांपना... सिर्फ एकही दिनमे उसपर अपना चांदसितारा फडकेगा..!” खान आढ्यतेने म्हणाला आणि बादशहा खुश झाला.
“ठीक है, कलही १० हजार की फौज लेकर तुम निकलो.” बादशहाने हुकुम दिला आणि खान खाली बसला.
रायगडावर संभाजी राजे आपल्या मंत्रिमंडळाबरोबर मोहिमेची तयारी
करत होते. तेवढ्यात एक दूत गुप्तहेराने पाठवलेला निरोप घेवून आला.
बादशहाच्या दरबारात घडलेल्या सगळ्या घटना त्याने राजांच्या कानावर घातल्या.
एकीकडे मुघल फौजांची एक तुकडी सह्याद्रीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालत होती.
त्यांचा बिमोड करण्यासाठी राजांना रायगड सोडता येणार नव्हता. बातमी तर खूपच
गंभीर होती. नाशिक हातून जाणे म्हणजे स्वराज्याचे सगळ्यात मोठे नुकसान
होणार होते. शेवटी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर राजांनी रामशेजच्या
किल्लादारासाठी एक खलिता पाठवला. त्यात जितका होईल तितका प्रतिकार करावा पण
वेळप्रसंगी योग्य तो निर्णय स्वतःच घ्यावा असा निरोप पाठविण्यात आला.
हाच खलिता रावजी घेऊन आला होता.

*क्रमशः*
*क्रमशः*
खलबत संपवून जेव्हा किल्लेदार माजघरात आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. किल्लेदाराच्या बायकोने यापूर्वी त्याला कधीही इतके काळजीत पाहिले नव्हते. किल्लेदारापुढे बोलायची हिम्मत तिच्यात नव्हती. काहीवेळ गंभीर शांततेत गेला. पण शेवटी तिने विचारलेच.
“काय सांगावा आलाय गडावरनं?” तिचा आवाज ऐकला आणि किल्लेदार
काहीसा भानावर आला. तसे तिला सांगून किंवा न सांगून काही फरकही पडणार
नव्हता. पण जर वेळ आली तर मात्र त्याला सगळ्यांचीच मदत घ्यावी लागणार होती.
आणि म्हणूनच त्याने आपल्या बायकोला गरजेच्या गोष्टी सांगण्याचा निर्णय
घेतला.
“बादशहाची वाकडी नजर हिकडं वळलीय..!” त्याने मोघम उत्तर दिले.
‘म्हंजी? म्या नाय समजले.” ती गोंधळली.
“राजानं खलिता धाडलाय. बादशहाची फौज येऊ ऱ्हायली. ज्ये शक्य आसंन त्ये करा.” हे बोलत असताना किल्लेदाराची नजर शून्यात होती.
तिच्या अंगावर सरसरून काटा आला. एकतर लहानपणा पासून तिने मुगल
फौजांचा नंगानाच पाहिला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली
आणि जनतेला चांगले दिवस आले. शिवाजी राजांच्या रूपाने देवानेच अवतार घेतला
आहे अशी तिची ठाम समजूत होती. पण आता महाराज हयात नव्हते. जरी संभाजी
महाराजांनी मोठ्या महाराजांचे कार्य आपल्या हाती घेतले होते तरीही यावेळेस
ते मदतीला येऊ शकणार नव्हते. तसा खलिताही त्यांनी पाठवला होता. बादशहाबद्दल
ज्या गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या त्यात एकही गोष्ट समाधानकारक
नव्हती. जो बादशहा स्वतःच्या बापाचा, भावांचा झाला नाही तो जनतेचा काय
होणार अशीच तिच्या मनाची समजूत होती. मध्येच बादशाहने त्याच्या मुलुखात
जिझिया कर लावल्याच्या बातम्या येत होत्या. मुघल सैन्याने हिंदूंची मंदिरे,
पवित्र स्थाने यांची तोडफोड आणि लुट केल्याच्या बातम्याही वरचेवर तिच्या
कानावर येत होत्या. आणि त्याच बादशहाची फौज आपल्या गडावर चालून येते आहे
म्हटल्यावर तिचे मन शहारले. ती जितके आपल्या नवऱ्याला ओळखत होती तितके तो
कोणत्याही परिस्थितीत किल्ला मुघलांच्या ताब्यात सहजासहजी देणार नाही याची
तिला पूर्ण खात्री होती. म्हणजेच युद्ध अटळ होते. आणि जेव्हा मुघल सैन्य
युद्ध करून किल्ल्यात प्रवेश करेल त्यावेळेस त्यांच्यात आणि राक्षसात काहीच
फरक असणार नाही, हेही ती जाणून होती. त्यामुळेच काय बोलावे हेच मुळी तिला
सुचेना.
“तुला काय वाटतं?” एकाएकी किल्लेदाराने आपल्या बायकोला प्रश्न
केला. त्याचा आवाज ऐकताच ती गोंधळली. काय उत्तर द्यावे तिला सुचेना.
किल्लेदाराने परत तोच प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर देणे भाग आहे हे
ती समजून चुकली.
“म्या काय बोलणार? तुमी ज्ये काय ठरवलं आसंन त्येच करनार...
पन म्या काय म्हन्ते, कितीबी मोठी फौज असुदे, आपन त्यास्नी जवर आपल्या
जीवात जीव हाये तवर रोखायचं.” तिने उत्तर दिले आणि किल्लेदाराला आपल्या
बायकोचा अभिमान वाटला.
“हंग अस्सं... आता कितीबी फौजफाटा असू दे... जवर ह्यो
किल्लेदार जित्ता हाय तवर एक बी सैनिक हितं येऊ देनार नाई...!”
किल्लेदाराच्या चेहऱ्यावर आता मात्र काळजीचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते.
किल्ल्यावर आता धावपळ दिसत होती. काही वेळापूर्वीच किल्ल्यावर
दवंडी फिरली होती. सगळ्यांना सर्यास्ताच्या वेळी वाड्यासमोरील पटांगणात
हजर होण्यास सांगण्यात आले. हळूहळू प्रत्येक जण हजर झाला. जवळपास सगळे जमले
आहेत याची खात्री करून किल्लेदाराने बोलायला सुरुवात केली.
“येक उल्शिक वाईट बातमी हाये. कालच्याला संबाजी राजांकडनं
खलिता आलाय. त्यांनी सांगावा धाडलाय, बादशाची फौज आपला गड ताब्यात घ्यायला
येऊ ऱ्हायली. चार सा दिसात समदी फौज हितं यील. फौज लैच मोठी हाये. धा बारा
हजाराचा फौजफाटा हाये. संबाजी राजांनी आपल्यालाच निर्नय घ्यायचा सांगावा
धाडलाय. आपन हितं ५००/६०० लोकं आन बादशाची फौज धा हजाराची, त्यात हत्ती,
तोफा आन घोडेबी भरमसाट. युध केलं त किती दिवस आपला निभाव लागन आजच्याला
सांगता येनार नाई. हारलो त लुटालूट हुईल. काय करायचं म्या ठरीवलं हाये पर
एकडाव तुमचा इचार घ्येतलेला बरा.” आपले म्हणणे सांगून किल्लेदाराने
सगळ्यांवर नजर टाकली. हळूहळू चुळबुळ वाढली. आवाजही वाढत गेला आणि
त्यांच्यातून एकजण पुढे आला.
“किल्लेदार...! हुब्या आयुश्यात म्या कदी माघार घ्येतली नाई.
म्याच काय पन ह्ये समदेबी माघार घीनार नाईत. ह्ये आपलं राज्य हाये. शिवाजी
म्हाराजांच. त्यांनी आपल्यासाठी जीवाची पर्वा केली नाई आनी आता आपली बारी
हाये. बादशाची फौज धा हजार असो वा पन्नास हजार. जवर जीवात जीव हाये तवर
त्यास्नी येक पाऊल बी फुड टाकू द्यायचं नाई. तुमी फकस्त आज्ञा द्या. आई
भवानीचं आशिर्वाद हाये आपल्यासंग. आपन लढायचं... हर हर महादेव...!” समोर
आलेल्या तरुणाने आपले मत दिले आणि आसमंतात हर हर महादेवचा जयघोष घुमला.
किल्लेदाराच्या अंगावर मुठभर मांस चढलं. ज्या रयतेच्या राजाला कित्येकांनी
नीटसं पाहिलं देखील नव्हतं त्याचं राजासाठी प्रत्येकजण आपल्या प्राणाची
आहुती द्यायला एका पायावर तयार होता.
काही क्षणातच किल्लेदाराचा चेहरा कठोर बनला. अंगात वीरश्री संचारली आणि त्याने घोषणा दिली.
“हर हर महादेव ! जय छत्रपती शिवाजी म्हाराज..!! जय छत्रपती
संबाजी म्हाराज...!!!” त्याने घोषणा दिली आणि सगळ्यांच्याच अंगात एक नवे
चैतन्य संचारले.
“ठरलं...! आता लढायचं. जवर जीवात जीव हाये तवर लढायचं.” किल्लेदार बोलत होता आणि एक म्हातारा पुढे आला.
“मला उल्शिक बोलायचं हाये...” त्याने किल्लेदाराकडे पहात म्हटले.
“बोला तात्या... काय हुकुम हाये आम्हास्नी?” किल्लेदाराने आदबीने विचारले.
“आपन लढायचं म्हनतो पन निस्त म्हनलं आन झालं असं ऱ्हातं व्हय?
पराक्रम असला तरीबी काई गोष्टी आपल्याला आदीच करून ठीवाया लागतीन.” त्याने
आपले वाक्य पूर्ण केले. किल्लेदारालाही हे पटले.
“म्या काय म्हन्तो, आदी पोटाचा इचार केल्याबिगर काय उपयोग नाई.” त्याने मुख्य मुद्दा उपस्थित केला.
“तात्या... आपल्याकडं दोन तीन वर्ष पुरंल इतका धान्यसाठा हाये.” किल्लेदाराने सांगितले.
“आरं पर अनुभवानं येक गोष्ट मला म्हाईत हाये. बादशाच्या
फौजेनं येढा दिला मंग त्यो कितीबी दिस तसाच ऱ्हाईल. येकदा का आपलं धान्य
संपलं मंग आपन युध न करता उपासमारीनं मरू. त्याचा काय उप्योग?” त्याने आपला
विचार बोलून दाखवला आणि त्यावर किल्लेदार गंभीर झाला. गोष्ट विचार
करण्यासारखीच होती. प्रत्येक गोष्ट तपासून पाहणे तितकेच गरजेचे होते. शेवटी
त्यांने तात्यांनाच प्रश्न केला.
“तुमी म्हंता त्ये समदं बरुबर हाये. पन मंग?”
“म्या काय म्हन्तो, बादशाची फौज आजूक चार दिस त हितं येत नाई.
तवर धा बारा जनांनी त्रंबकगडाकडं जावं. तितंल्या लोकास्नी रानवनस्पती आन
कंद ठावं हायती. त्याची माहिती घीवून हितं यावं. ते कंद एकदा खाल्ली की मंग
दोनदोन दिस कायबी खान्याची गरज पडत नाई. आपन त्याचा वापर करू.” तात्याने
आपला विचार सांगितला आणि किल्लेदार खुश झाला. त्याने लगेचच १० जणांची निवड
करून त्यांना त्र्यंबकगडाकडे रवाना केले.
पुढचा प्रश्न होता तो प्रत्यक्ष लढाईचा. दोन वार आपण केले तर
एकवार त्यांचाही झेलावा लागणार. शेवटी मानवी शरीर म्हटल्यावर जखमा होणारच.
त्याने ताकद हळूहळू कमी देखील होणार. यावर काय उपाय करावा हाच
किल्लेदारापुढे आता मोठा प्रश्न होता. इतक्या मोठ्या फौजेला आपण काही शेकडा
लोकं कसे थोपवून धरणार? आणि एकाएकी त्याच्या डोक्यात विचार आला. समजा
फौजेला किल्ल्यापर्यंत पोहचू दिलेच नाही तर? हाच विचार त्याने सगळ्यांपुढे
मांडला आणि एकेक करत काही जण पुढे आले.
‘किल्लेदार... म्या दगड फोडून देतो. किल्ल्यावर लय साठा हाय
बगा दगडांचा. आपन त्ये वरून टाकले तरी १०/१२ जन एकाच दगडात मरतीन.” रामा
लोहार म्हणाला.
“आन म्या लाकडाची तोप करतू... पन त्यासाठी चामडं बी लागन...” तुका सुतार उत्तरला.
“आरं मंग म्या हाय ना. तू तोप बनव. चामडं म्या काढतो.” सदू
म्हणाला आणि किल्लेदार आश्चर्यानं पहातच राहिला. संभाजी राजांनी पाठवलेला
दारुगोळा तोफेविना काहीच कामाचा नाही असेच तो समजून चालत होता. पण मनात
जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हेही त्याला हळूहळू समजत होते.
“म्या येक बोलू का?” जमलेल्या लोकांमधून एक पोरगं पुढं आलं.
किल्लेदाराने आता पर्यंत प्रत्येक जण किती महत्वाचे योगदान देतो आहे हे
पाहिले होते. आता हे लहानसं पोरगं काय सांगणार याचाच तो विचार करू लागला.
“हा बोल की...!” किल्लेदार कौतुकाने त्याच्याकडे पहात म्हणाला.
“आमी पोरं पिकांच राखन करन्यासाठी गोफन चालीवतो. येका दगडात
येक पाखरू मारतो. त्येचा वापर केला तर? संग गलोरीबी हायेत.” त्याने आपला
विचार बोलून दाखवला आणि जमलेल्या मंडळीत खदखद पिकली. एवढ्याशा गोफणीने आणि
गलोरीने कुणी मरेल हा विचारच करणे तितकेसे योग्य वाटत नव्हते. लोकांना
हसताना पाहून ते पोरगं काहीसं हिरमुसलं. किल्लेदार मात्र गंभीर झाला.
गोफणीतून सुटलेला एक दगड जेव्हा वरून खाली जाईल तेव्हा त्याचा वेग आपोआपच
वाढलेला असेल. तसेच दगड लागलेला माणूस स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने खाली
कोसळेल यात काहीच शंका करण्यासारखे नव्हते. गलोरीने एकेक जण टिपता येणार
होता. मुलाच्या त्या विचाराने किल्लेदार अगदीच खुश झाला. त्याने मुलाला जवळ
बोलावले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली आणि त्याचा विचार कसा
उपयोगी आहे हे सगळ्यांना सांगितले. बरे गोफण फिरवायला आणि गलोरी वापरायला
मुले, म्हातारे आणि स्त्रिया सगळ्याच सक्षम असल्याने हेच त्याने आपले
प्रमुख हत्यार बनवले. किल्लेदाराच्या या निर्णयामुळे जे लोक प्रत्यक्ष
युद्धात भाग घेऊ शकणार नाही असे वाटत होते तेही स्वराज्याचे शिलेदार बनले.
चार दिवसात लढाईसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटत त्या
सगळ्यांची पूर्तता करून किल्लेदार आणि त्याचे सगळे सैनिक बादशहाच्या फौजेची
वाट पाहू लागले.

*क्रमशः*
*क्रमशः*
सकाळ झाली तसे हजारीने आपले सैन्य गोळा केले. जवळपास अडीचशे
घोडेस्वार आणि साडेसातशे पायदळ गडाच्या पायथ्याशी जमा झाले. प्रत्येक जण हा
कसलेला योद्धा होता. आजपर्यंतच्या अनेक लढायांमध्ये त्यांनी आपले शौर्य
गाजवलेले होते. राजपुतांना पाणी पाजून आलेली सेना या छोट्याशा गडावर चाल
करून जाणार होती. समोरासमोर लढाई सुरु झाल्यावर जास्तीत जास्त दोन तीन
घटकेतच गड काबीज करून किल्लेदाराला खानापुढे हजर करू अशी शेखी हजारी मिरवत
होता. स्वराज्यातील इतर गडांच्या तुलनेत या गडाची चढाई म्हणजे अगदीच किरकोळ
म्हणता येण्यासारखी होती. चढणीचा रस्ता जरी लहान होता तरी चढण अगदीच
अंगावर येणारी नव्हती.
सगळे सैन्य जमले आहे याची खात्री झाल्याबरोबर हजारीने सुरुवात केली.
“महान शहंशाह आलमगीर के सिपाहियो... आजतक आप जिस जंगमे उतरे
हो, सिर्फ फतेह हासील की है, खुद आलमगीर शहंशाह को भी आपपर विश्वास है...
और इसी विश्वास को आपको फिरसे साबित करना है... ये किला तो बहुत ही छोटासा
है. आपके सामने ये आधे दिन भी टिक नही पायेगा... तो चलो, लेलो उसको अपने
कब्जेमे. फेहेरावो उसपर चांदसितारा... काफिर किलेदार को जहन्नूम का रास्ता
जो भी दिखायेगा उसे बादशहा खुद इनाम देंगे... अल्ला हु अकबर...” हजारीने
केलेल्या वीरश्रीयुक्त भाषणाने प्रत्येक शिपायाच्या अंगावर मुठभर मास चढले.
प्रत्येकाचे मन युद्धासाठी तयार झाले. आसमंतात ‘अल्ला हु अकबर’ चा स्वर
निनादू लागला. मुघल सेनेच्या तुकडीने गडाच्या दिशेने कूच केले. हजार
शिपायांचा तांडा छोट्याश्या किल्ल्याची धूळधाण करण्यासाठी सज्ज झाला होता.
‘अल्लाहु अकबर’च्या घोषणा गगनाला भिडत होत्या.
इकडे किल्ल्यावर मात्र अगदी पूर्ण शांतता पसरली होती. ना
कोणता आवाज येत होता ना कोणती हालचाल दिसून येत होती. मुघल सैन्याच्या
प्रत्येक शिपाई वर पहात गड चढत होता. किल्ल्यावरून काहीच आवाज होत
नसल्यामुळे किल्लेदार आणि किल्ल्यावरील सैन्य पुरते घाबरले असून लढाई न
करताच किल्ला आपल्या ताब्यात येणार याची जवळपास खात्रीच प्रत्येक सैनिकाला
झाली होती. आणि याच आनंदात त्यांचा गड चढण्याचा वेग वाढला. सगळीकडे अल्ला
हु अकबरच्या घोषणेबरोबरच धुळीचे लोट आसमंत झाकोळून टाकत होते.
मुघल सैन्याच्या तुकडीने जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर
चढला आणि एकाएकी ‘हर हर महादेव’ चा जयघोष आसमंतात घुमला. हा जयघोष इतका
मोठा होता की एक हजार माणसांच्या अल्ला हु अकबरच्या घोषणा देखील त्यापुढे
कमजोर वाटू लागल्या. एकाएकी किल्ल्याच्या तटबंदीवर अनेक लोकं दिसू लागले.
किल्लेदार घाबरून किल्ला आपल्या सुपूर्द करेल ही त्यांच्या मनातला विचार
क्षणार्धात मावळला. काही वेळ होतो न होतो तोच ढगांचा गडगडाट व्हावा तसा
आवाज ऐकू येऊ लागला. सोबत वरून धुळीचे लोळ पायथ्याच्या दिशेने झेपावू
लागले. काय होते आहे हे लवकर हजारीच्या लक्षात देखील आले नाही. आणि जेव्हा
त्याच्या लक्षात आले तेंव्हा वेळ निघून गेली होती. अनेक मोठमोठ्या शिळ्या
त्यांच्या रोखाने गडगडत येत होत्या. त्यांचाच गडगडाट आसमंत भेदून राहिला
होता. खानाच्या सैन्याला आता माघार घेणेही शक्य नव्हते. पुढे जावे तर वरून
दगड धोंड्यांचा पाऊस. मागे फिरावे तर जागेचा आभाव. आणि पहिला धोंडा सर्वात
पुढे असलेल्या शिपायांवर आदळला. ५/६ जण तर त्याखालीच चिरडले गेले.
त्यांच्या तोंडून आवाजही फुटू शकला नाही. तो धोंडा मात्र त्याच्या मार्गात
येणाऱ्या जवळपास पंचवीस तीस सैनिकांना स्वर्गाचा रस्ता दाखवूनच थांबला.
एकामागोमाग एक शिळा वरून खाली झेपावत होत्या. एक धोंडा
चुकवावा तर दुसरा धोंडा समोर येत होता. त्याला चुकवावे तर त्याच्या
धक्क्याने कोसळणारा सैनिक अंगावर येत होता. खानाच्या सैन्यात आता मात्र
हाहाकार माजला. ‘अल्लाहू अकबर’ घोषणेची जागा किंकाळ्यांनी घेतली. जो तो वाट
फुटेल तिकडे पळत सुटला. त्यातही कित्येक जण फक्त तोल सावरता आला नाही
म्हणूनही आपला जीव गमावून बसले. सैन्याच्या या तुकडीचे नेतृत्व ज्या
हजारीकडे होते तो तर कधीचाच आडवा झाला होता. जिकडे पाहावे तिकडे प्रेतांचा
खच पडला होता. अगदी काही वेळातच खानाच्या १००० फौजेची पूर्ण वासलात लागली.
आसमंत मुघल सैन्याच्या किंकाळ्या आणि गडावरील मराठा सैन्यःच्या शिवाजी
महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयकाराने दणाणून गेला.
खानाचे सैन्य मागे फिरले हे जेव्हा किल्लेदाराने पाहिले
त्यावेळेस त्याने लगेचच आपल्या लोकांना इशारा केला. त्याबरोबर गडावरून
टाकण्यात येणाऱ्या दगडांचा पाऊस देखील पूर्णतः थांबविण्यात आला. गडावर एकच
उत्साह संचारला होता.
चढाईवर गेलेल्या सैन्याच्या तुकडी मधील अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोकं सुखरूप परतले. जवळपास साडेतीनशे लोक कायमचे जायबंदी झाले. चारएकशे लोकं प्राणास मुकले तर दोनशे लोकं किरकोळ जखमी होऊन परत फिरले. अडीचशे घोडेस्वारामधील एकही व्यक्ती सुखरूप नव्हता. बरेच जण तर त्यांच्याच घोड्यांच्या पायाखाली तुडवले गेले होते. जवळपास १०० घोडे कायमचे जायबंदी झाले होते. आणि उरलेल्या घोड्यांपैकी कित्येक वाट फुटेल तिकडे पळून गेले होते.
चढाईवर गेलेल्या सैन्याच्या तुकडी मधील अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोकं सुखरूप परतले. जवळपास साडेतीनशे लोक कायमचे जायबंदी झाले. चारएकशे लोकं प्राणास मुकले तर दोनशे लोकं किरकोळ जखमी होऊन परत फिरले. अडीचशे घोडेस्वारामधील एकही व्यक्ती सुखरूप नव्हता. बरेच जण तर त्यांच्याच घोड्यांच्या पायाखाली तुडवले गेले होते. जवळपास १०० घोडे कायमचे जायबंदी झाले होते. आणि उरलेल्या घोड्यांपैकी कित्येक वाट फुटेल तिकडे पळून गेले होते.
खानासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. सगळ्यात जास्त संताप
त्याला या गोष्टीचा होता की, आपली १००० लोकांची फौज जाऊनही किल्ल्यावरील
एकाही माणसाला साधी जखमही करू शकली नव्हती. किल्ल्यावरील लोकांचे मनोधैर्य
चौपट वाढले होते, तर खानाच्या फौजेचे मनोधैर्य निम्म्याने कमी झाले होते.
त्यातही पोटार्थी सैनिक आणि स्वराज्याच्या ध्येयाने लढणारे सैनिक यात फरक
होताच की. शेवटी पूर्ण पंधरा दिवसांचा आराम करून नंतर परत नव्या जोमाने
किल्ल्यावर आक्रमण करण्याचे खानाने ठरवले. पण या दिवसात किल्ल्याला दिलेला
वेढा मात्र अजूनच सक्त करण्यात आला.
इकडे गडावर मात्र आनंदी वातावरण होते. मुघल फौज कितीही
संख्येत आली तरी आपण तिला तोलामोलाची टक्कर देऊ शकतो हे प्रत्येक
व्यक्तीच्या मनावर पूर्ण ठसले होते. किल्लेदारही सगळ्यांच्या पाठीवर
शाब्बासकीची थाप देत होता. त्याच बरोबर अगदी दिवस रात्र त्याचा किल्ल्यावर
वावर होत होता. गेल्या पंधरा दिवसात खानाच्या फौजेने कोणत्याही प्रकारे
आक्रमण केलेले नसले तरी त्याचा तळही हलला नव्हता. म्हणजेच आज ना उद्या परत
आपल्यावर आक्रमण होणार हे किल्लेदाराला चांगलेच उमजले होते.
खानाच्या तंबूत रोजच खलबते होत होती. आक्रमणाच्या अनेक नवनवीन
योजना समोर येत होत्या. पण त्यातील कोणतीच योजना खानाला भरवशाची वाटत
नव्हती. आता तो चांगलाच सावध झाला होता. विचार करता करता त्याला एक योजना
सुचली. १ हजाराची फौज एकाच बाजूने गेली आणि त्यामुळे त्यांना पराभव
पत्करावा लागला. एकाच वेळी कमी लोकांसह जर किल्ल्याच्या सगळ्याच बाजूने
चढाई सुरु केली तर? नुकसानही कमी होईल आणि किल्ला काही वेळातच ताब्यात
येईल. त्याचा विचार त्यालाच पसंत पडला. आपण आधीच हा विचार का केला नाही
म्हणून तो स्वतःवरच चरफडला.
काही वेळातच फौजेचे मुख्य सेनानायक त्याच्या तंबूत हजर झाले.
त्याने आपली योजना सगळ्यांना बोलून दाखवली. परिस्थितीचा विचार करता सगळ्यात
योग्य अशीच ती योजना होती. फौज विखुरलेली असल्यामुळे आता वरून गडगडत
येणारे दगड चुकवणे त्याच्या सैनिकांना सोपे जाणार होते. नुकसानही अगदीच कमी
होणार होते. खान चांगलाच खुश झाला. पाहिजे तितकी सावधगिरी न बाळगल्यामुळे
आपली एक हजाराची फौज हकनाक कमी झाली याची त्याच्या मनात असलेली खंत आता
कुठल्या कुठे पळाली.

क्रमशः
क्रमशः
किल्ल्यावरील लोकांमध्ये मात्र अशा बातम्या ऐकून भीतीऐवजी
त्याच्याबद्दल राग उत्पन्न होत होता. शेवटी तो दिवस उजाडला. खानाचा तळ
किल्ल्याच्या पायथ्याशी पडला. किल्ल्यावरून जिकडे नजर जाईल तिकडे हिरवे
झेंडे आणि कापडी तंबू दिसू लागले. खानाने आणलेली दहा हजाराची फौज आणि वाटेत
त्याला सामील झालेली दोन हजाराची फौज असा बारा हजाराचा फौजफाटा
किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाला. आल्या आल्या खानाने किल्ल्याला वेढा
दिला. त्यामागे उद्देश हाच होता की यामुळे किल्लेदारावर दबाव येईल आणि तो
स्वतःहून किल्ला आपल्या सुपूर्द करेल.
किल्ल्याला वेढा देऊन दोन दिवस उलटून गेले पण किल्लेदाराचा
कोणताही दूत खानाकडे येण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी खानानेच आपला एक दूत
किल्ल्यावर पाठवायचे ठरवले. त्यासाठी एका मराठी माणसाची नियुक्ती करण्यात
आली. मराठी माणसाची नियुक्ती करण्यामागेही खानाचा कुटील हेतू होता. कोणताही
मुसलमान अधिकारी पाठवला असता तर त्याच्यावर किल्लेदाराने कितपत विश्वास
ठेवला असता हे सांगणे कठीण होते. जर दूत मराठी असेल तर त्याच्यावर जास्त
विश्वास ठेवला जाईल असेच त्याला वाटत होते. तसेच किल्लेदाराचे मन वळवण्याचा
प्रयत्न फसला तरी दूत मराठी असल्याकारणाने त्याला कोणतीही इजा केल्याशिवाय
परत पाठवले जाईल हेही खान चांगलेच जाणून होता. दूत जिंवत परत येणार म्हणजे
किल्ल्यावर किती फौजफाटा आहे, आपल्याला किती प्रतिकार होऊ शकेल हे सगळेच
त्याला समजणार होते.
तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस खानाचा दूत किल्ल्याच्या मुख्य
दरवाज्यासमोर उभा राहिला. शिरस्त्याप्रमाणे पहारेदाराने दरवाज्याच्या
झडपेतून त्याला विचारले.
“कोन हाये?”
“म्या सरदारांचा दूत हाये. किल्लेदारास्नी भेटायचंय.
खानसायबांनी निरोप धाडलाय किल्लेदारासाठी.” दूताने आपले येण्याचे कारण
सांगितले. एकटाच कुणी दूत असेल तर त्याला बेलाशक आत घ्या असा किल्लेदाराने
आपल्या पहारेकऱ्यांना आधीच हुकूम सोडला असल्याने महाद्वाराला लागून असलेला
एक छोटा दरवाजा उघडला गेला आणि दुताला त्याचा घोडा बाहेरच ठेवून आत घेण्यात
आले.
दूत जसा छोट्या दारातून आत आला, त्याच्याकडून हत्यारे काढून घेतली गेली. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. त्याला एका घोड्यावर बसवण्यात आले आणि काही वेळातच त्याला किल्लेदारासमोर उभे करण्यात आले.
दूत जसा छोट्या दारातून आत आला, त्याच्याकडून हत्यारे काढून घेतली गेली. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. त्याला एका घोड्यावर बसवण्यात आले आणि काही वेळातच त्याला किल्लेदारासमोर उभे करण्यात आले.
“डोळ्याची पट्टी काढा !” किल्लेदाराचा आवाज घुमला आणि
दूताच्या डोळ्यावरील पट्टी उतरवली गेली. दूत एका काहीशा मोठ्या खोलीत उभा
होता. खोलीच्या खिडक्यांवर पडदे टाकण्यात आले होते. समोरच किल्लेदार एका
आसनावर बसला होता. त्याच्यापासून थोड्या दूर अंतरावर एक कारकून हाताची घडी
घालून उभा होता. दोघेही दुताकडे रोखून पहात होते. दोघांच्या मनात काय विचार
चालू आहे याचा काहीसा अंदाज घेण्याचा दूत प्रयत्न करत होता.
“बोल...! काय संदेश हाये?” किल्लेदाराने काहीसे दरडावून विचारले.
“जी...!” काहीसा भानावर येत दूताने आपल्या कमरेला खोचलेला
खलिता किल्लेदारासमोर धरला. किल्लेदाराचा आवाज ऐकूनच त्याच्यापुढे
बोलण्याची दूताची हिंमत झाली नाही. किल्लेदार जागेवरून मुळीच हलला नाही.
अगदी चपळाईने कारकून पुढे आला. दूताच्या हातातील खलिता आपल्या हातात घेतला
आणि तो आदबीने किल्लेदाराच्या सुपूर्द केला.
किल्लेदाराने खलिता हातात घेतला आणि नंतर काहीसा विचार करत
परत कारकुनाच्या हाती देत त्यांनी त्यालाच तो वाचण्यास सांगितले. कारकुनाने
खलिता मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली.
--------------
किलेदार रामसेज,
बादशहा सलामत, आलमगीर औरंगजेब के हुकुमसे जितने जल्द हो सके,
किला सरदार शहाबुद्दीनखान के सुपूर्द करे | किलेपर जितने भी लोग है वो,
बादशहा सलामत की रयत होगी | आजसे उनको बादशहा सलामत को लगान देनी होगी |
इनमे जितने भी काफर होंगे उनको अलगसे जिझियाकर देना होगा | अगर कोई इसे
देनेसे इन्कार करेगा तो उसे बगावत मानी जायेगी और उसका सर कलम किया जायेगा |
लेकीन अगर कोई इस्लाम कबूल करता है तो उसे जिझिया देनेकी जरुरत नही है |
महान शहनशहा आलमगीर उसको अपनी फौजमे शामिल करेंगे | अगर किलेदार किला
देनेसे इन्कार करता है तो किलेपर हमला किया जायेगा | उसे माफी नही मिलेगी |
उसका सर कलम करके किलेके दरवाजेपर लटकाया जाएगा | अगर किलेदार राजीख़ुशीसे
किला सरदारके सुपूर्द करता है तो उसपर बादशहा सलामत की रहम होगी | उसे
अच्छासा इनाम दिया जाएगा |
सरदार शहाबुद्दीन खान |
सिपेसालर शहंशाह आलमगीर औरंगजेब ||
-----------------
कारकून जसजसा खलिता वाचत होता, किल्लेदाराचा चेहरा लाल होत
होता. दूत मात्र आता मनातून घाबरला होता. खलिता वाचत असताना त्याने मान
खाली घातली होती. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट फक्त एकच होती.
किल्लेदार त्याच्याच धर्माचा होता. किमान त्याचा विचार करून तरी त्याला
कोणतीही इजा झाल्याशिवाय तिथून बाहेर पडण्याची आशा होती. खलिता वाचून पूर्ण
झाला आणि दूताने मान वर करून किल्लेदाराकडे पाहिले. किल्लेदाराच्या
डोळ्यात अंगार फुलत होते. दुताला खानाने इतके पढवून पाठवले होते पण
किल्लेदारापुढे बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही.
“ठिक हाये, तुज्या खानाला निरोप सांग. ज्ये काय करायचं असंल
त्ये कर, पर ह्यो किल्लेदार जवर जित्ता हाये तवर किल्ल्यावर तुजी सावली
सुदिक पडायची नाई. आन ह्ये बी सांग, तुज्या त्या बादशाला वळखत नाई आमी.
आमचा राजा येकच हुता. शिवाजी राजा आन आता संबाजी राजा आमचा राजा हाये.
जा... ह्योच निरोप दे खानाला.” इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला.
“ए कोन हाय रे, याचे डोळे बांधा आन याला सलामत किल्ल्याच्या
भायेर काढा. दगाबाजी करायला आमी काय बादशा नाई.” शेवटचे वाक्य किल्लेदाराने
मुद्दामच उद्गारले होते. एकजण धावतपळत आत आला. त्याने दूताचे डोळे बांधले
आणि त्याला सुखरूप किल्ल्यातून बाहेर पाठवले.
दूताने आणलेला निरोप ऐकून शहाबुद्दीन खान पुरता चवताळला.
त्याने जितकी माहिती मिळवली होती त्यानुसार किल्ल्यावर जास्तीत जास्त ८००
माणसे होती. त्यातही मुलांचा, वृद्धांचा आणि महिलांचा समावेश. म्हणजे
लढणारे सैनिक असतील तर ते पाचशेहून अधिक नसणार हाच त्याने मनाशी विचार
केला. आणि त्या पाचशे लोकांच्या जीवावर किल्लेदार आपल्याला असा संदेश
पाठवतो हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हते. आपल्या माणसांचा विचार न
करणारा किल्लेदार नक्कीच वेडा असावा असा त्याचा समज झाला. वेड लागल्याशिवाय
का कुणी बारा हजाराच्या फौजेशी फक्त ५०० लोक घेऊन लढाईची गोष्ट करेल? बरे
१२ हजार फौजही कुणाची? तर ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार
अफगाणिस्तानपर्यंत वाढवला त्या आलमगीर शहंशहाची. ५०/६० तोफा, मुबलक
दारुगोळा आणि कसलेले शिपाई असलेली फौज कुठे आणि ५०० सैनिक कुठे. आणि
म्हणुनच दूताने आणलेल्या संदेशावर विश्वास ठेवणे त्याला अवघड जात होते.
आजपर्यंत त्याने बादशहाच्या अनेक मोहिमेत हिरीरीने भाग घेतला
होता. कित्तेक मोहिमा त्याने फत्ते केल्या होत्या. कित्येक जण तर त्याच्या
क्रौयाच्या कथा ऐकूनच युद्ध न करता शरण आलेले होते. बघता बघता त्याचा चेहरा
तापला.
“कौन है बाहर?” त्याने मोठ्याने आवाज दिला आणि एक शिपाई अगदी धावतपळत तंबूत आला.
“जाव जल्दी और मानेको बुलाव..!” त्याने हुकुम सोडला.
काही वेळातच त्याचा हेर त्याच्या पुढ्यात उभा होता.
“कितने लोग बताये तुमने किलेपर?” त्याने दरडावून विचारले. आडदांड शरीराचा संतापलेला खान त्याच्या हेराला मूर्तिमंत यमदूत भासला.
“सब मिलाकर ८०० लोग ही होंगे सरदार...!” हेराने घाबरत उत्तर दिले.
“और बताव...!”
“उनमे बुढे, बच्चे और औरतेभी है, किलेपर एक भी तोप नही है.
आमनेसामने की लढाई होती है तो वो आधा दिन भी नही टिक पायेंगे.” हेराने जे
आधी सांगितले होते तेच परत सांगितले. हे ऐकताना सरदाराची नजर हेरावर खिळली
होती. हेर आपल्याशी खोटे तर बोलत नाहीना याचीच खान खात्री करून घेत होता.
“ठीक है, जाव...! और सिपाई को अंदर भेजो.” म्हणत खानाने त्याला आज्ञा दिली.

क्रमशः
क्रमशः
“हुजूर...” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची तंद्री भंग पावली... त्याने एकवार हुजऱ्याकडे पाहिले. तो खाली मान घालून उभा होता.
“आ गये सब?” खानाने विचारले.
“जी हुजूर...”
“अंदर भेजो...” हुजऱ्याला आज्ञा देत खान आपल्या जागेवर जाऊन बसला. काही वेळातच ७/८ जण खानाच्या शामियान्यात शिरले.
“बैठो...!!!” खानाचा हुकुम होताच प्रत्येक जण आपापल्या मानाप्रमाणे आसनस्थ झाला.
“करीमखान... इससे पेहेले हमे शिकस्त क्यो झेलनी पडी?” खानाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.
“सरदार... मुझे इसकी सिर्फ एक वजह दिखती है... हमारी फौज सिर्फ एक तरफ थी...” काहीसे बिचकत करीमखान उत्तरला.
“बराबर...! लेकीन आज हम वो गलती नही करेंगे... आज शामतक
किलेपर अपना चांदसितारा फडकेगा...” खान आढ्यतेने म्हणाला आणि सगळ्यांनी
त्याच्या सुरात सूर मिसळला.
“करीमखान... तुम चारसौ लोग लेकर सामनेसे जाओगे... दौलतखान...
तुम पाचसौ लोग लेकर पिछेसे हमला करोगे... देशमुख... तुम जंगलकी तरफसे पाचसौ
सिपाई लेकर हमला करोगे और नाईक पाचसौ सिपाई लेकर जंगलकी दुसरी तरफसे हमला
करेगा... एक बात सबको याद रखनी है... हर एक सिपाई दो तीन गज की दुरी बनाकर
ही आगे बढेंगे.” खानाने आपली योजना सांगितली.
“बहोत बढीया सरदार... आज शाम या तो किलेदार आपके सामने होगा
या उसका सर...” करीमखान म्हणाला आणि बाहेर पडला. त्याच बरोबर इतर सर्वजण
देखील बाहेर पडले.
किल्ल्याच्या तटावरून पाहणी करणाऱ्या किल्लेदाराला आज
खानाच्या फौजेमध्ये जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्याचाच अर्थ आजच पुन्हा
आपल्यावर आक्रमण होणार हे त्याने ओळखले. पण एक गोष्ट मात्र त्याला विचार
करायला भाग पाडत होती. आणि ती म्हणजे त्याला कोणत्याही बाजूला खानाची फौज
एकवटलेली दिसत नव्हती. याचाच अर्थ खानाने यावेळेस आक्रमण करण्यासाठी नवीन
योजना आखली होती. एकाएकी त्याच्या मनात विचार आला. नक्कीच आपल्या
किल्ल्यावर चहुबाजूने हल्ला करण्याचा खानाचा विचार असणार. पाहता पाहता
किल्लेदार गंभीर झाला. कारण मोठ्या संख्येने जर चहुबाजूने आक्रमण झाले तर
मात्र आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने जाणले.
काही वेळातच मुगल सैन्याने चारही बाजूंनी डोंगर चढायला
सुरुवात केली. यावेळेस सैन्य जास्तच होते, तसेच ते विखुरलेले होते.
प्रत्येक सैनिक हा एकमेकांपासून बरेच अंतर राखून वर चढत होता. आता जर
किल्ल्यावरून दगड लोटले तरीही ते चुकवणे त्यांना शक्य होणार होते आणि हाच
सगळ्यात मोठा धोका किल्लेदाराने ओळखला.
गनीम तर अगदी तयारीने पुढे येत होता. परत एकदा अल्लाहू अकबरचा
स्वर गगन भेदत जवळजवळ येत होता. यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे
किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच आपल्या
लोकांना आवाज दिला. अनेक उमदे तरुण त्याच्यापुढे हजर झाले.
“जी किल्लेदार...!” त्यातील एकाने आदबीने विचारले.
“आपले पोरं हाय नव्हं, त्यास्नी बोलवा.” किल्लेदाराने आज्ञा केली आणि काही वेळातच सगळे पोरं किल्लेदारासमोर हजर झाले.
“काय रे पोरांनो... आपल्या राज्यासाठी लढनार ना?” काहीसे हसत त्याने विचारले आणि सगळ्यांनी एकमुखाने होकार दिला.
“मंग आता असं करायचं. तुमची ती पाखरं मारायची गलोरी हाय
नव्हं. ती घ्यायची आन या येनाऱ्या गनिमावर तानायची. एकेकाला टिपायचा. जवर
त्यो कोसळत नाई तवर त्याला सोडायचं नाई... काय?” किल्लेदाराने आज्ञा दिली
आणि पोरांना आनंद झाला. आज खऱ्या अर्थाने ते स्वराज्यासाठी, आपल्या संभाजी
राजांसाठी प्रत्यक्ष युद्धात भाग घेणार होते.
“आन हा... ज्या कुनाला गोफन चालविता येते त्यांनी बी या
पोरास्नी मदत करायची. ध्यानात ठिवा... येक बी मानुस नाय सुटला पायजेल.”
किल्लेदाराने हुकुम सोडला. मुलांच्या बरोबरीने बायकाही युद्धात सामील
झाल्या. सगळेजण किल्ल्याच्या चहूबाजूंनी तटावर आले आणि गोफण फिरायला
सुरुवात झाली.
गनीम बराच पुढे आला होता. आपल्या माराच्या टप्यात येताच गलोरीतून एक छोटा दगड सुटला. एक सैनिक वर पहात पुढे येत होता. तो बरोबर त्याच्या नाकावर बसला. त्या छोट्याश्या दगडाला इतका वेग आलेला होता की त्या सैनिकाचे नाक फुटले. वेदनेने विव्हळत तो खाली वाकला आणि त्याचा तोल गेला तसा तो खाली कोसळला. बाकी सगळे काम उताराने चोख बजावले. दगडांवर ठेचकाळत जो जेव्हा थांबला तेंव्हा त्याच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेले होते.
गनीम बराच पुढे आला होता. आपल्या माराच्या टप्यात येताच गलोरीतून एक छोटा दगड सुटला. एक सैनिक वर पहात पुढे येत होता. तो बरोबर त्याच्या नाकावर बसला. त्या छोट्याश्या दगडाला इतका वेग आलेला होता की त्या सैनिकाचे नाक फुटले. वेदनेने विव्हळत तो खाली वाकला आणि त्याचा तोल गेला तसा तो खाली कोसळला. बाकी सगळे काम उताराने चोख बजावले. दगडांवर ठेचकाळत जो जेव्हा थांबला तेंव्हा त्याच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेले होते.
“हंग अस्सं... भले शाब्बास...!!!” किल्लेदाराने त्या मुलाला
शाब्बासकी दिली आणि त्या चिमुरड्याची छाती अभिमानाने फुगली. हळूहळू
गोफणीतून एकेक दगड सुटू लागला आणि वर येणारा एकेक जण खाली कोसळू लागला.
खान आपल्या काही निवडक लोकांसह चहुबाजूने आपल्या फौजेवर नजर
ठेवण्यासाठी फिरत होता. जसजशी त्याची माणसे एकेक करून कोसळू लागली, तो
पुरता चवताळला. या वेळेस वरून एकही मोठा दगड गडगडला नव्हता. आणि तरीही एकेक
जण टिपला जात होता. आता मात्र डोंगर चढणाऱ्या सैनिकांचा धीर हळूहळू सुटत
चालला. आपल्या बरोबर असलेला माणूस फक्त ओरडतो आणि कोसळतो इतकेच त्यांना
दिसत होते. ना त्यांच्यावर एखाद्या शस्त्राचा वार ना रक्ताचे पाट. आणि
तरीही एकेक करून वर चढणारे सैन्य कमी कमी होत होते. या वेळीही कित्येक जण
किल्ल्याच्या अर्ध्या डोंगरावरच जायबंदी झाले. आता मात्र जीव वाचवायचा तर
माघार घेणेच जास्त गरजेचे होते. माघारी पळून जाण्याशिवाय त्यांना पर्याय
होताच कुठे?
आपले सैन्य माघार घेते आहे हे काही वेळातच करीमखानाच्या
लक्षात आले. परत फिरणे म्हणजे स्वतःचा मान कमी करून घेणे होते. त्याने
आपल्या घोड्याला टाच दिली आणि तो सगळ्यात पुढे झाला. वरून होणारा दगडांचा
मारा बिलकुल कमी होत नव्हता. पण करीमखानाला मात्र आता कशाचीच फिकीर नव्हती.
त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, आणि ती म्हणजे कसेही करून किल्ल्यावर
विजय मिळवायचा. त्याच्या पाठोपाठ पन्नास एक जणांनी आपले घोडे भरधाव फेकले.
किल्लेदार हे सगळेच ताटावरून पहात होता. काही वेळासाठी त्याचे मन कचरले. जर
यातील एकही जण किल्ल्याजवळ पोहोचला तर मुगल सैन्याचे मनोबल वाढणार होते.
किल्ल्यावरून होणारा दगडांचा मारा अंगावर झेलत खान पुढे झाला आणि इथेच
त्याने चूक केली. परत एकदा किल्ल्यावरून एक मोठी शिळा त्याच्या रोखाने
गडगडत आली. करीमखानाच्या घोड्याने वेग घेतला असल्यामुळे ती चुकवणे त्याला
शक्य होऊ शकले नाही आणि त्याचा तोल गेला. तो खाली पडतो न पडतो तोच आणखी एक
दगड गडगडत आला आणि त्याच्या खाली करीमखान चिरडला गेला. आपल्या डोळ्यादेखत
आपला सेनानायक पडलेला पाहून खानाच्या मागे असलेल्या सैनिकांचे धैर्य संपले.
“या खुदा...” करत एकेकाने आपले घोडे मागे फिरविण्याचा प्रयत्न
केला पण तो पर्यंत अनेक दगड आपले काम चोख बजाऊन गेले होते. जी गत
करीमखानाची झाली होती काहीशी तशीच गत इतर बाजूंनी चाल करण्यासाठी गेलेल्या
मुगल सैन्याची झाली होती. नाईक जायबंदी झाला होता, देशमुख दगडाखाली चिरडला
गेला होता आणि दौलतखानाने पूर्णतः माघार घेतली होती. किल्ल्यावर चढाईसाठी
गेलेली दोन हजाराची फौज देखील कुचकामी ठरली होती.
Comments
Post a Comment