संत तुकोबांचा उपदेश
संत तुकोबांचा उपदेश
*संगतीनें होतो पंगतीचा लाभ ।*
*अशोभी, अनुभव असिजेतें ।।१।।*
*जैसीं तैसीं, असों पुढिलांचे सोई ।*
*धरिती हातीं पायीं, आचारिये ।।ध्रु.।।*
*उपकारी नाहीं देखत आपदा ।*
*पुढिलांची सदा दया चित्तीं ।।२।।*
*तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ति ।*
*पुरवावी आर्ति निर्बळांची ।।३।।*
*अर्थ व चिंतन -*
*काही
लोक कर्तृत्ववान माणसांच्या सहवासात येतात. त्यांच्या मोठेपणाचा गौरव
करतात. पण कधी त्यांच्यासारखं वागून, त्यांच्याइतके कष्ट घेऊन
त्यांच्याएवढं मोठे होत नाहीत.*
*मोठ्या
'पण चुकीच्या' माणसांच्या संपर्कात येऊन फक्त त्यांचा जयजयकार करणे, झेंडे
वागवणे, चपला उचलणे इथपर्यंतचं लोक मर्यादित राहतात. 'तुम आगे बढो, हम
तुम्हारे पिछे हैं ।' म्हणतात. असं करणारे आयुष्यभर मागेच राहतात.*
*तुकोबांच्या मते, 'पाय त्यांचेच धरा, जे तुमच्या हाताला धरून तुम्हाला (सर्वार्थाने) 'उभं' करतील.'*
*मोठ्या
माणसाबरोबर एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर फारतर तुम्ही सोबत आलात म्हणून
तुम्हाला त्यांच्यासोबत 'पहिल्या रांगेत' बसायला मिळेल. कुठे कार्यक्रमात
सोबत जेवणासाठी गेलात तर एकाच पंगतीत जेवायचा मानही मिळेल.*
*तुकोबा
म्हणतात, "संगतीने पंगतीचा लाभ होत असतो. हे खरं जरी असलं, तरी हे
तोपर्यंत 'अशोभनीय' आहे, जोपर्यंत त्यांच्याइतका तुम्ही स्वतः अनुभव घेत
नाहीत, तोपर्यंत."*
*संगतीने
पंगतीचा लाभ होत असला तरी, त्यांच्या विचारांचं आचरण होणं गरजेचं आहे.
त्या मोठ्या माणसाच्या सहवासात येऊन, फक्त सत्कारापूरता मान मिळण्यात
धन्यता न मानता, 'त्यांच्याइतके कष्ट सहन करणे, वेळ देता येणे, स्वतः तेवढा
अभ्यास करणे, जिद्द मनात निर्माण करणे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून
चालणे' हे करता आलं तरंच, 'संगतीला' किंमत आहे. नुसताच रात्री धाब्यावर
कुणी 'व्यवस्था' करतंय म्हणून किंवा नुसतंच सोबत घेऊन फिरतंय म्हणून त्याचा
जयजयकार नको.*
*इथं मला
स्वतःला आवर्जून सांगावं वाटतं, मी मा. प्रदीप दादा सोळुंके यांच्या संगतीत
आलो, तर मला पंगतीचा लाभ तर मिळालाच, पण सोबत आयुष्याचं कल्याणही झालं.
'कुणाच्या पायाला धरल्यावर ते हाताला धरून 'उभं' करतात' याचं उत्तम उदाहरण
म्हणजे मा. प्रदीप दादा सोळुंके. विशेष म्हणजे ते पायही धरू न देताच उभं
होण्यासाठी प्रचंड ताकत देतात. मी वक्ता आणि लेखक होण्याला एकमेव तेच
प्रेरक आहेत.*
*तुकोबा
पुढे म्हणतात, "आपल्या पद्धतीने होईल तेवढं पुढे गेलेल्या 'महापुरुषांच्या,
संतांच्या, समाजसुधारकांच्या' मार्गाने चला. तुम्ही जर त्यांचं आचरण केलं,
त्यांच्या पायाजवळ विसावले, तर ते तुमच्या हाताला धरून त्यांच्या
(विचारांच्या) वाटेनं घेऊन जातील."*
*"कारण
ही माणसंच मुळात उपकारी असतात. आपल्या विचारानं वागणाऱ्या लोकांवर उपकार
करताना स्वतःला काय त्रास होतो, याची ते काळजी करत बसत नाहीत. प्रत्येकवेळी
समोरच्याच्या भल्याचाच ते मनात विचार करत असतात." अशा माणसाच्या सहवासातच
'अनुयायांना, कार्यकर्त्यांना' कधीच निराशा पदरी पडत नाहीत. शंभर टक्के
कल्याण होतंच.*
*"अशा
पद्धतीने सज्जन माणसांची कीर्ती असते. असा यांचा महिमा असतो. त्यांच्याही
मनात 'संपर्कात आलेल्यांचं' कल्याण व्हावं असंच असतं. म्हणून ज्याला-ज्याला
भलं करून घ्यायचं आहे, त्यांनी आवर्जून या 'परोपकारी' माणसांच्या संगतीत
राहिलं पाहिजे."*
*आणखी एका ठिकाणी तुकोबा म्हणतात,*
*तुका म्हणे संग उत्तम असावा ।*
*यावीन उपावा काय सांगो ? ।।*
*"तुमची
संगत चांगली असावी, यापेक्षा दुसरा उपाय तुम्हाला काय सांगू?" तुमच्या
आयुष्याचं कल्याण होण्यासाठी तुमचे मित्र चांगले असणं, हाच एकमेव उपाय
आहे.*
*प्रत्येकानं
तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे शक्यतो वागण्याचा प्रयत्न केल्यास, पराभवाचा
सामना करण्याची वेळ येण्याचा प्रसंग सहसा येणारच नाही.*
Comments
Post a Comment