संगत गुण  खुप महत्वाचा

एक मद्यपी एका गुरूंकडे गेला. म्हणाला, मला संन्यास घेण्याची प्रबळ
इच्छा आहे. अनेक गुरूंना मी भेटलो आहे. पण, मी पक्का दारुडा आहे.
मला सकाळी तोंड धुतल्याबरोबर पहिला पेग लागतो. रात्री झोपेपर्यंत
मी अनेक बाटल्या रिचवतो. सगळे गुरू म्हणतात आधी दारू सोड.
मग तुला संन्यास देतो. तुमचं काय म्हणणं आहे?


हा गुरू जरा वेगळा होता. तो म्हणाला, तुला दारू पितोस, गोमूत्र पितोस,
की आणखी काही पितोस, हा तुझा विषय आहे? त्याच्याशी
माझा काय संबंध? पी, बिनधास्त पी. तुला हवी तेवढी पी. मी तुला दीक्षा
देणार. संन्यासी बनवणार. अट फक्त एकच आहे. एकदा संन्याशाची
वस्त्रं परिधान केलीस की ती कायमस्वरूपी घालावी लागणार. दिवसातून
दोन तास संन्यासी बनतो आणि बाकी वेळ शर्टपँटपायजमाबर्म्युडा
घालून फिरतो, असं चालणार नाही. एकदा भगवं वस्त्र परिधान केलंस
की ते अंघोळीच्या वेळेव्यतिरिक्त अंगातून काढायचं नाही.


एवढी छोटी अट आहे, म्हटल्यावर दारुड्याने आनंदाने ती मान्य करून संन्यासदीक्षा स्वीकारली.


महिन्याभरानंतर तो परत आला आणि गुरूच्या पायावर डोकं टेकून
म्हणाला, तुम्ही माझा सॉलिड गेम केलात.


गुरूंनी विचारलं, काय झालं?


तो म्हणाला, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी भगवी वस्त्रं
स्वीकारली आणि संन्यास घेऊनही मद्यपान करता येणार, या आनंदात
बारमध्ये गेलो. बारच्या दारात पोहोचलो आणि बाहेरच एकाने गाठलं,
म्हणाला, मला आत जाण्यापासून अडवा. रोखा. महाराज मला उपदेश
करा. मी अट्टल दारूडा बनलो आहे. मी त्याला सांगितलं, मीही अट्टल
दारुडाच आहे, मीही बारमध्येच चाललोय. पण, माझी वस्त्रं पाहून
त्याचा विश्वास बसेना. त्याच्या हट्टाखातर मी त्याला उपदेश केला.
तोवर इतर चार लोक गोळा झाले. त्यांनी मला जवळच्या बगीच्यात
नेलं आणि सत्संगच करायला लावला. मग मला बारमध्ये जाण्याची
भीती वाटायला लागली. दारूच्या दुकानात गेलो, तर दुकानदाराने
नम्रतेने नमस्कार केला आणि माझ्यासाठी दूध मागवलं. मी बाटली
मागितली, तर म्हणाला, महाराज, चेष्टा करताय का? मी हे दुकान
चालवतो, पण थेंबालाही स्पर्श करत नाही. तुमच्या सत्संगाला कुठे
येऊ सांगा. नंतर नंतर ही वस्त्रं परिधान करून देशी दारूच्या
अड्ड्यावरही उभं राहण्याची माझी हिंमत होईना. एवढ्या सगळ्या
भानगडीत माझा दारूचा मजा किरकिरा झाला तो कायमचाच.


गुरू हसले आणि म्हणाले, माझ्याकडून आजही कसलीही आडकाठी
नाही. तुला दारूच्या नशेची ओढ असेल, ही वस्त्रं त्याआड येत असतील,
तर ही वस्त्रं त्याग आणि खुशाल दारू पी.


शिष्य हसून म्हणाला, आता ते कठीण आहे. तुम्ही मला त्यापेक्षा
मोठं व्यसन लावलंत.


संगत गुण  खुप महत्वाचा.


Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी