स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास

'स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा टाईमपास ' हा आपला लेख वाचला. लेखाच्या शीर्षकावरुन एका चांगल्या विषयाला आपण हात घातला असे वाटले. पण, नंतर माझी निराशाच झाली. अख्ख्या महाराष्ट्रात गावोगावी, सर्व महाविद्यालयांमध्ये, जिकडेतिकडे स्पर्धा परीक्षांचे गुणगान केले जात आहे. माफ करा साहेब, पण त्याचीच री तुम्ही ओढली. या परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उत्तीर्ण न होण्याचं खापर तुम्ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्याच डोक्यावर फोडलं. विद्यार्थी सोळा तास अभ्यास करत नसल्यामुळे ते या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत नाहीत असे आपले म्हणणे आहे. 
प्रकाश भोसले साहेब, तुम्ही अतिशय तर्कशुद्ध लिहिता म्हणून तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल अशी मला आशा आहे. माझ्या माहितीप्रमाणे युपीएससीच्या दरवर्षी ११०० च्या जवळपास जागा असतात. गेल्या सात-आठ वर्षांपासून महाराष्ट्राचे १०० ते १२५ मुलं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या १० टक्के आहे व हे उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणही १० टक्के आहे. याचा अर्थ मराठी मुले यात मागे नाहीत.  यापेक्षाही जास्त प्रमाण वाढलं तर  इतरांवर तो अन्याय होईल. थोडक्यात ही ओरड निरर्थक आहे. खरा मुद्दा हा आहे की या परीक्षेला महाराष्ट्रातून तीसहजार मुले बसतात व उत्तीर्ण फक्त  शंभर सव्वाशेच होतात. समजा सगळ्या मुलांनी सोळा तास अभ्यास केला व पूर्ण देशासाठीच्या अकराशेही जागा मराठी मुलांनीच पटकावल्या तरी तीसहजार मुलांपैकी अकराशेच मुलांना नोकऱ्या मिळतील. याचप्रमाणे एमपीएससीच्या चार पाच हजार जागांसाठी पाच लाख मुलं परीक्षा देतात. या सर्वच मुलांनी सोळा नव्हे चोवीसही तास अभ्यास केला व भरपूर गुण मिळवले तरी शंभरातल्या एकालाच नोकरी मिळणार आहे. शंभरातील ९९ मुलांना  कोणत्याही परिस्थितीत नोकरी मिळणारच नाही हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. मग त्या मुलाचा अभ्यास कमी पडला, जिद्द, सातत्य, परिश्रम कमी पडले असे खापर आपण त्याच्या माथी फोडू शकतो. 
खरं म्हणजे ही विद्यार्थ्यांचीच घोर फसवणूक आहे. याला शासन, समाज व ' स्पर्धा परीक्षा काळाची गरज आहे ' असं कानीकपाळी ओरडून सांगणारे वक्ते जबाबदार आहेत. अठराव्या वर्षापासून ते चाळीशी येईपर्यंत बिचारे लाखो मध्यमवर्गीय तरुण आपलं उमेदीचं वय , तारुण्य नासवत आहेत. 
आणि ज्याचं नशीब फडफडतं आणि ज्या एखाद्या नशीबवंताला सरकारी नोकरी मिळते , त्याला इतका जास्त पगार आणि इतकी  सुरक्षितता मिळते की त्यामुळे कोणाला या स्पर्धा परीक्षांपासून परावृत्तही करता येत नाही. 
नोकरी पटकावलेला कोणीएक मुलगा अनुभवकथन करत फिरतो, आणि हजारो युवकांचं आयुष्य खराब करतो. ऐन उमेदीचे दहा पंधरा वर्ष या अभ्यासात घालवल्यानंतर तो तरुण कोणताही उद्योग व्यवसाय करण्याच्या क्षमतेचा व मानसिकतेचा राहात नाही. 
या मास हिस्टेरियापासून समाजाला वाचविणे आवश्यक आहे. तुम्ही तर्कशुद्ध लिहिणारे प्रथितयश लेखक आहात. तुम्ही हा मुद्दा समजून घेऊन याला वाचा फोडाल अशी आशा करतो.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी