ही गोष्ट आहे एका भारतीय इंजिनीयरची… त्याच्याच शब्दात

ही गोष्ट आहे एका भारतीय इंजिनीयरची…
त्याच्याच शब्दात….


सर्व पालकांप्रमाणे माझ्याही पालकांचे स्वप्न म्हणून मी इंजिनिअर झालो. USA स्थित कंपनीत नोकरीवर रुजू झालो. जेंव्हा USAच्या भूमीवर पाय ठेवले तेंव्हा माझी स्वप्नपूर्ती झाली.


सुरुवातीलाच मी ठरवले की इथे फक्त पाचच वर्ष चांगली नोकरी करायची, भरपूर पैसे कमवायचे आणि भारतात परत जाऊन स्थिरावायचं.


माझे वडील सरकारी नोकरदार होते. त्यांनी निवृत्ती नंतर त्यांच्या हयातीतील एकमेव इस्टेट खरेदी केली होती ती म्हणजे *One-bedroom flat!*


मला त्यांच्यापेक्षा खूप काही जास्त करायचे होते. मी खूप चांगले आणि मन लावून काम करू लागलो.


सुरुवातीचे नवीन दिवस गेल्यानंतर मला घराची ओढ लागली. जेंव्हा कॉल रेट कमी असेल तेंव्हा मी घरी आई बाबांना फोन करू लागलो. साधारणतः आठवड्यातून एकदा मी घरी आई बाबांना फोन करत असे.


पिझ्झा आणि बर्गर चा आस्वाद घेत आणि डिस्को थेकला वरचेवर भेट देत दोन वर्षे संपली. फॉरेन एक्सचेंजच्या रेट वर माझे सतत लक्ष असे. जेंव्हा जेंव्हा रुपयांचा रेट कमी होई तेंव्हा तेंव्हा मला खूप आनंद होई.


मी नंतर लग्न कारायचा निर्णय घेतला. घरी फोन करून सांगितले की मला फक्त १० दिवसच सुटी आहे. त्यामुळे १० दिवसांत परत USA ला यावं लागेल. तुम्ही मुली पाहून ठेवा. सर्व तयारी तयारी करून ठेवा. मी आल्यावर फायनल करेन आणि दोन दिवसांत लग्न करून तिला घेऊन USA ला येईन.


मग मी त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट आरक्षित केले.


मी भारतात घरी पोहोचल्यानंतर पहिले दोन दिवस मित्र मंडळी आणि नातेवाईक भेटायला येत होते. रात्री आई वडिलांबरोबर बसून त्यांनी पसंत केलेल्या मुलींचे फोटो पाहिले.


दिवस सरत होते. माझी परतायची वेळ जवळ येत होती त्यामुळे त्यातलीच एक मुलगी मला जबरदस्तीने पसंत करावी लागली.


पुढच्या २ दिवसांत लग्न उरकून आई वडिलांना काही रक्कम देऊन शेजाऱ्यांना साश्रु नयनांनी त्यांची काळजी घेण्याबद्दल विनंती करून मी पत्नीसह परतीच्या प्रवासाला निघालो.


USA ला आल्यानंतर नवीन संसार सुरु झाला. सुरूवातीला पत्नीला भारतापेक्षा इथे खूपच चांगले वाटू लागले. २ महिन्यांनंतर मात्र तिला खूपच एकटे वाटू लागले. त्यामुळे भारतात फोन करण्याचा आधीचा खर्च आता दुपटीपेक्षा जास्त झाला. पूर्वी मी घरी आई बाबांना आठवड्यातून एकदा फोन करत असे. ते आता आठवड्यातून दोनदा आणि कधी कधी तीनदा पण करू लागलो. तसेच पत्नीच्या माहेरीही फोन करणे वाढले. आमची बचत कमी होऊ लागली. खर्च खूपच वाढले. भारतात यावे असे वाटत होते पण सुटी आणि पैसे असे दोन प्रॉब्लेम होते.


पुढच्या दोन वर्षात आम्हाला दोन मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी.


आता मात्र ‘भारतात थोड्या दिवसांसाठी का होईना याच…’ असा घरून खूपच आग्रह होऊ लागला. पण भारतभेट मात्र दिवसेंदिवस अवघड होत चालली.


सर्व व्यवस्थित चालले असतांना एक दिवस अचानक सोसायटीतील एका काकांचा फोन आला…


_’आई आणि बाबा खूप आजारी आहेत आणि ताबडतोब निघा. उशीर होईल.’_


मी खूप प्रयत्न केला पण सुटी मिळाली नाही. शिवाय विमानाची तातडीची ४ तिकिटे तीही परतीच्या प्रवासासहित… खूपच अवघड झाले.


पण काळ थांबत नाही. पुन्हा एक कुणाच्यातरी फोनवरून निरोप मिळाला, आई आणि बाबा दोन दिवसांच्या अंतराने पाठोपाठ देवाघरी निघून गेले. पुन्हा सोसायटीतल्या शेजाऱ्यानी आपले कर्तव्य बजावले.


आई आणि बाबा मात्र नातवंडांचे तोंड न पहाताच देवाघरी निघून गेले होते. आता भारतात जाऊन मी तरी काय करणार होतो?


आता मात्र माझी अस्वस्थता खूपच वाढली होती. मला मायभूमीची ओढ तिथे शांत राहू देत नव्हती.


पत्नीचा विरोध आणि मुलांना कसे पटवून सांगायचे या द्विधा मनस्थितीतच मी भारतात परत येऊन इथेच स्थिरावायचे ठरवले.


भारतात परतल्यानंतर वडिलांचा One bedroom flat मोकळाच होता. पण फार दिवस त्या घरात राहू शकलो नाही, कारण USA मधले राहणीमान वेगळे होते. तिथे  भाड्याचे का असेना पण प्रत्येकाला स्वतंत्र खोली असणारे घर होते.


मी मोठे घर पाहायला सुरुवात केली. दुसरीकडे नोकरीचा शोध सुरूच होता. निराशा खूपच वाढत होती. प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडल्यामुळे वडिलांचा One bedroom flat विकून त्यात माझी बचत मिळवूनही हवे तेव्हडे मोठे घर मी घेऊ शकत नव्हतो.


मग मला USA ला परत जाण्यावाचून पर्याय उरला नव्हता. आता मात्र घरची परिस्थिती बदलली होती. पत्नी USA ला परत यायला तयार नव्हती आणि मुले भारतात राहायला.


शेवटी २-३ वर्षे पैसे कमवून मी नक्की भारतात परत येईन असे पत्नीला वचन देऊन मी आणि दोन्ही मुले USA ला परत आलो.


पुन्हा थोडे स्ट्रगल केले आणि एकदाचा USA ला स्थिरावलो.


वय वाढत होते आणि जबाबदाऱ्याही. त्यातली मोठी जबाबदारी मुलीच्या लग्नाची. पण ती तिची तिनेच एका अमेरिकनबरोबर लग्न करून सोडवली. आणि मुलगा इथे अगदी मजेत होता.


मी ठरवले, आता मात्र इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. आपलं कोण आहे इथे?


पण आता थोडे पैसे शिल्लक होते. वडिलांचा One bedroon flat विकून त्यात माझी बचत मिळवून आता मी चांगल्या लोकेशनला मोठा फ्लॅट घेऊ शकणार होतो. शिवाय आता माझ्या हातात भारतातली नोकरीची एक चांगली ऑफर देखील होती.


भारतात परतलो. पुढची ५-६ वर्षे चांगली नोकरी केली. आणि रिटायर झालो. आता थोडा थकलो देखील आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीला देवाज्ञा झाली. खूप एकटेपण जगतोय.


आता मी फारसा घराबाहेर पडत नाही. सकाळी मंदिरात जाण्यासाठी आणि काही रुटिन कामांसाठी तेव्हढा बाहेर पडतो.


*आता कधीकधी असे वाटते की खरंच जीवनात एवढी वचवच करायची गरज होती का?*


वडिलांनी भारतात राहून सरकारी नोकरी करून, माझे चांगले शिक्षण करून देखील निवृत्ती नंतर स्वतःचा One bedroon flat घेतलाच होता की…!


मी मात्र एका बेडरूम साठी माझे आईवडील आणि मुले गमावून बसलो.


माझी मुले मला कधी कधी whatsapp वर किंवा mail वर “तुम्ही बरे आहात ना?” असे विचारतात.


खिडकीतून बाहेर पहाताना कधी कधी कंठ दाटून येतो आणि वाटते की माझ्या निधनानंतर परत शेजारी त्यांचे शेवटचे  कर्तव्य बजावतीलच. देव त्यांना ताकद देवो!


पण मी मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय!


Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी